सावंतवाडी /-
माहितीच्या अधिकारात खोटी माहिती दिल्याप्रकरणी जिल्ह्यातील कुडाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी केली आहे. याबाबत त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली आहे. त्यात श्री. मेंगडे यांच्याकडे माहिती मागवली होती. परंतु ती माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही, असे त्यांनी आपल्याला कळवले आहे. मात्र प्रत्यक्षात ती माहिती त्यांच्याकडे उपलब्ध असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणात आपल्याला त्यांनी खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न होते. त्यामुळे हा ठपका ठेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, असे त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
याबाबत मेंगडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आपण बरेगार यांनी ज्या माहितीची मागणी केली होती त्याप्रमाणे त्यांना माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र काही माहिती कार्यालयीन रेकॉर्डला मिळू शकली नाही. तसे त्यांना आम्ही कळवले आहे. त्यामुळे त्यांची काही तक्रार असेल तर ते वरिष्ठ अपिलीय अधिकाऱ्यांकडे दाद मागू शकतात. त्या ठिकाणी समाधान न झाल्यास राज्य आयोगाकडे सुद्धा ते जाऊ शकतात. जी माहिती माझ्याकडे उपलब्ध नाही ती देऊ कशी, असेही ते म्हणाले.
