सावंतवाडी /-
तंत्रशिक्षण संचालनालयाने डी. फार्मसी प्रथम वर्ष प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली असून विद्यार्थ्यांना १५ जुलैपर्यंत अर्ज करता येईल. आवश्यक ती कागदपत्रे व दाखले मिळण्यात अडचणी येत असल्याने प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी ही मुदतवाढ दिली आहे. यानंतर १७ जुलैला तात्पुरती तर २० जुलैला पक्की गुणवत्ता यादी जाहीर होईल. त्यानंतरच संस्था निवडण्यासाठीच्या पसंतीक्रम फेरीला (कॅप राउंड) सुरुवात होईल.
सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे व तहसील कार्यालयांतून मिळणारे विविध प्रकारचे दाखले अद्यापही विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेले नाहीत. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज भरता आलेले नाहीत. बारावीची मुळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखलाही गेल्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या ताब्यात मिळाले. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन अर्ज भरण्यासाठी ही मुदतवाढ केली गेली आहे. डी. फार्मसीसाठी बारावीच्या गुणांवरच प्रवेश दिला जाणार आहे. विद्यार्थाना १५ जुलैपर्यंत http://dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावयाचे आहेत. सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजमध्ये शासकीय प्रवेश सुविधा केंद्र सुरू असून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरणे, कागदपत्रांची पडताळणी याकरिता संपर्क साधावा असे आवाहन बी. फार्मसी प्राचार्य डॉ. विजय जगताप व डी. फार्मसी प्राचार्य सत्यजित साठे यांनी केले आहे.