कणकवली /-
गेल्या तीन वर्षापासून स्थलांतराबाबत चर्चा बैठका सुरू असलेला येथील शिवाजी चौकामधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शुक्रवारी पहाटे प्रशासनाने स्थलांतरित केला. नगरपंचायत प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात ही कार्यवाही केली. दरम्यान छत्रपतींचा पुतळा नगरपंचायत मध्ये सुरक्षितरीत्या ठेवण्यात आल्याचे समजते.
महामार्ग चौपदरीकरणात सर्विस रोडवर येत असलेला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरित करण्याबाबत गेल्या तीन वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र शिवसेना व भाजप यांच्यामधील जागा निश्चिती वरून हा पुतळा जैसे थे राहिला होता. पालकमंत्री उदय सामंत यांनी याबाबत सर्वपक्षीय बैठक घेऊन तोडगा काढला. मात्र त्यानंतर पुढे कोणतीच कार्यवाही न झाल्याने हा प्रश्न अधांतरीच राहिला. अखेर दोन दिवसांपूर्वी या पुतळ्याच्या बाजूला साईकृपा इंजिनिअरिंग वर्क्स येथे नवीन पुतळा स्थापन झाला व त्यानंतर या पुतळा स्थलांतराचा विषय पुन्हा चर्चेत आला.
दरम्यान प्रशासकीय पातळीवरही याबाबत गेले दोन दिवस चर्चा सुरू होत्या. अखेर शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास नगरपंचायत प्रशासनाकडून छत्रपतींचा पुतळा सुरक्षित रित्या स्थलांतरित करण्यात आला. छत्रपतींचा पुतळा नगरपंचायत मध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्याचे समजते. त्यानंतर जेसीबीच्या माध्यमातून जागेची साफसफाई करण्यात आली. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेला हा विषय मार्गी लागल्याचे दिसत आहे.