देवगड /-
देवगड तालुक्यातील कुणकवण या गावातील बौद्धवाडीमध्ये येथील नागरिकांसाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेमधून बांधण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमध्ये चक्क वहाळाचे गडुळ चिखल घाणीचे पाणी जात असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून स्थानिक ग्रामपंचायत यांना याबाबत वेळोवेळी निदर्शनास आणून देऊन देखील स्थानिक प्रशासन वाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.याबाबत अधिक वृत्त असे की कुणकवण ता. देवगड येथील बौद्धवाडीमध्ये सुमारे ३० से ४० कुटुंबे राहत असून स्थनिक ग्रामपंचायतीने सुमारे ५ वर्षापूर्वी येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी शासकीय योजनेतुन विहीर मारून दिली होती. तसेच या विहीरीवरून लघुनळयोजना करून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. मात्र सदर विहीर ही बौद्धवाडीच्या बाजूने जणाऱ्या मोठ्या वहाळाच्या शेजारी बांधण्यात आली असल्याने पावसाळ्यातून वाहणारे सर्व गढूळ व चिखलाचे पाणी या विहिरीत जात आहे. त्यामुळे येथील नागरिकाना हे दूषित पाणी प्यावे लागत आहे. या दूषित पाण्यामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता असून सबंधित आरोग्य विभागाने याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. तर शासनाच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने व स्थानिक ग्रामपंचायतीने देखील तातडीने यावर उपाय योजना करून येथील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी कसे मिळेल याबाबत प्रयत्न केले पाहिजेत असे ग्रामस्थ यांच्यातून मागणी होताना दिसत आहे.
