मुंबई /-

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबई हायकोर्ट तसेच हायकोर्टाच्या औरंगाबाद, नागपूर व पणजी (गोवा) खंडपीठांमधीलही न्यायालयीन कामकाज सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी पूर्ण बंद आहे.

महाराष्ट्र, गोवा तसेच दादरा-नगर हवेरी, दीव-दमण व सिल्वासा येथील सर्व कनिष्ठ कोर्टांमधील आणि न्यायाधिकरणांमधील कामकाजही बंद राहणार आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या नेतृत्वाखालील मुंबई हायकोर्ट प्रशासकीय समितीने रविवारी रात्री उशिरा याविषयी निर्णय घेतला.

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा आज सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

‘हायकोर्ट आणि खंडपीठांमध्ये आज सोमवार दि. ७ फेब्रुवारी रोजी न्यायालयीन कामकाज बंद राहील आणि त्या दिवसाचे कामकाज शनिवार, १२ फेब्रुवारी रोजी भरून काढले जाईल. अतितातडीच्या न्यायालयीन प्रकरणांत मंगळवार, ८ फेब्रुवारीपर्यंत थांबणे शक्य नसल्यास संबंधित पक्षकारांनी संबंधित पीठांसमोर ई-मेलद्वारे विनंती पाठवावी. अत्यंत तातडीचे प्रकरण असल्याविषयी समाधान झाल्यास संबंधित न्यायालय त्याचा विचार करेल. ज्या प्रकरणांत अंतरिम आदेश वा दिलाशाची मुदत संपत असेल त्या प्रकरणांत पक्षकारांना ई-मेलद्वारे तातडीचा अर्ज पाठवण्याची मुभा असेल. त्या प्रकरणांची सुनावणी संबंधित न्यायालय मंगळवार, ८ फेब्रुवारी रोजी घेईल. तसेच जी प्रकरणे ७ फेब्रुवारीच्या सुनावणीच्या यादीत होती त्यावर ती-ती न्यायालये ८ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेतील’, असे रजिस्ट्रार जनरल एम. डब्ल्यू. चांदवानी यांनी नोटीसद्वारे स्पष्ट केले. सर्व कनिष्ठ कोर्ट व न्यायाधिकरणांनी या दिवसाचे कामकाज नजीकच्या काळात सुटीच्या एखाद्या दिवशी कामकाज ठेवून भरून काढावे, असे चांदवानी यांनी कनिष्ठ न्यायालयांच्या प्रधान न्यायाधीशांना पाठवलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे.

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दि ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून आज सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page