बांदा /-
काही दिवसांपूर्वी सर्व वाहनांसाठी खुली करण्यात आलेली पत्रादेवी येथील “पोलीस लाठी” आज सायंकाळ पासून पुन्हा बंद करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी याठिकाणी पाहणी करत ही लाठी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. याठिकाणी केवळ दुचाकी चालकांनाच प्रवेश देण्याच्या सूचना स्थानिक पोलिसांना दिल्या. यावेळी दाभाडे यांनी गाळेल येथील पोलीस लाठीला देखील भेट दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोवा बंदी करण्यात आली होती. परंतु गोवा सीमावर्ती भागातील हजारो युवक-युवती गोव्यातील कंपन्यांमध्ये कामाला जात होते. मात्र जिल्हावसीयांना गोवा बंदी केल्यामुळे या युवकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली होती. दरम्यान या पार्श्वभूमीवर पत्रादेवी येथील पोलीस लाठी तात्काळ खुली करण्यात यावी यासाठी भाजप च्या कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले होते. या आंदोलनाची दखल घेत पत्रादेवी येथील लाठी खुली करण्यात आली होती. मात्र आज सायंकाळी उशिरा अचानक लाठी पुन्हा बंद करण्यात आल्याने स्थानिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.असे असले तरीही दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना सवलत देण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते.