मुंबई /-
कोरोना संसर्ग कमी असलेल्या २५ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल करण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी (ता. २९) जाहीर केले होते. परंतु याबाबतच्या आदेशावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी बाकी होती. दरम्यान, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संसर्ग कमी असलेल्या झोनमध्ये रात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज जीआर काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट केलं. त्यामुळे दुकानांच्या वेळा आणखी चार तासाने वाढवण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. सध्या सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंतच दुकाने सुरू आहेत. दुपारी 4 पर्यंत बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने दुकानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी व्यापारी आणि दुकानदारांकडून होत होती. त्याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आले असता त्यांनी ही माहिती दिली.राज्यातील दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे. मात्र, ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. तिथेच ही परवानगी असेल. कोरोना रुग्ण संख्या अधिक असलेल्या ठिकाणी निर्बंध कायम असतील, असं मुख्यमंत्री म्हणाले. या संदर्भातील जीआर आज संध्याकाळी निघेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.