✍🏼 लोकसंवाद /- वेंगुर्ला.
कालवी बंदर केळुस येथील आकाश फिश मिलचे पाणी पाईपलाईन द्वारे समुद्रात सोडल्यास त्या ठिकाणी जैवविविधतेचा धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे नियोजित पाईपलाईनच्या कामाला विरोध करण्याचा निर्णय पंचक्रोशीतील ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींकडून घेण्यात आला आहे. या पाईपलाईन विरोधात शेतकरी व मच्छीमारांनी समन्वय समिती करून एकत्रित लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. या कामाला ग्रामपंचायतीने ना हरकत दाखला देऊ नये, अशी ही मागणी करण्यात आली आहे.
याबाबत खास बैठक आयोजित करून आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला, तशा प्रकारची माहिती ग्रामस्थांच्या माध्यमातून प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. यावेळी स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी, महिला यांचेसह श्रमिक मच्छीमार संघाचे अध्यक्ष छोटू सावजी,उपाध्यक्ष बाबी जोगी, नॅशनल फिश फोरमचे सदस्य रविकिरण तोरसकर, अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती अध्यक्ष मिथुन मालंडकर, मच्छीमार नेते बाळू वस्त, राजेश गिराप, कासवमित्र सुहास तोरसकर, केळुस सरपंच योगेश शेटये, आंदुर्ला सरपंच अक्षय तेंडोलकर, तेंडोली माजी सरपंच भाऊ पोतकर, म्हापण माजी सरपंच नाथा मडवळ, केळुस ग्रामस्थ सुधीर प्रभू, केळुस सोसायटीचे चेअरमन अशोक नागवेकर, केळुस मच्छीमार सोसायटी चेअरमन गोविंद केळुसकर, माजी सभापती संजय वेंगुर्लेकर, राजू पावसकर, गृणीता गोकरणकर, प्रज्ञा केळुसकर, आरती पाटील, ग्रामपंचायत सदस्य मानसी कुडव, महेश नागवेकर,लक्ष्मण वराडकर, ग्रामस्थ रामचंद्र राऊळ, माजी सरपंच संतोष पराडकर, हेमंत शेलटकर यांच्यासह शेतकरी व मच्छीमार बांधव तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
