✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी.
प्रस्तावित बारसू प्रकल्पाच्या सुरू असलेल्या माती परीक्षणला विरोध करणाऱ्या स्थानिक आंदोलकांचा छळ केल्याचा आरोप स्थानिक आंदोलकांकडून करण्यात आले आहेत. बारसू पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे अटकेच्या निषेधार्थ पंचक्रोशीतील प्रत्येक गावागावात ग्रामस्थांकडून निषेधार्थ फेऱ्या काढल्या जात आहे.
अटक केलेल्या आंदोलकांची सुटका करून आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, यासाठी सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून आंदोलकांनी शांततेत उपोषण केले. हे उपोषण एक दिवसीय होते. सायंकाळी ते मागे घेण्यात आले. यावेळी इतर गावातल्या लोकांना उपोषणस्थळी पोचण्यास प्रशासन मज्जाव करत असल्याचे बारसू शेतकरी ग्रामस्थांनी सांगितले आहे.
गेल्या काही दिवसांपासून माती परीक्षणाचे काम सुरू आहे त्याला स्थानिक ग्रामस्थांचा प्रचंड विरोध सुरू आहे. बारसूच्या सड्यावर रिफायनरी उभारणार असल्याने प्रकल्पविरोधक आक्रमक झाल्याचे मागील काही दिवसांत पाहायला मिळत आहे. माती परीक्षणाचे काम थांबविण्यासाठी सरसावलेले आंदोलक आणि पोलिस प्रशासन यांच्या झटापट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र दोन दिवसांपूर्वी पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे व इतर ६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ३५३ खालील अटकेच्या निषेधार्थ पंचक्रोशीतील प्रत्येक गावागावात निदर्शने केली जात आहेत. दरम्यान अमोल बोळे यांच्यासह अटक करण्यात आलेल्या सर्व ग्रामस्थांची सुटका केली नाही तर निषेधार्थ प्रचंड मोर्चा काढण्यात येईल, अशी प्रतिक्रीया स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
