कुडाळ /-
कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अजितकुमार बाळकृष्ण पाटील यांनी विषप्राशन करत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्यापअस्पष्ट आहे. अधिक तपास कुडाळ पोलीस करीत आहेत. अजितकुमार पाटील हे काल पालकमंत्री उदय सामंत यांच्या ताब्यात संरक्षक म्हणून कार्यरत होते.काल ते नेहमीप्रमाणे आपली ड्युटी बजावून सायंकाळी कुडाळ पोलीस ठाण्यात आले.काही वेळाने ९ च्या दरम्यान ते कुडाळ येथील शुभम रेसिडेन्सी येथे गेले.त्याच ठिकाणी त्यांनी फवारणी करण्याचे विषारी द्रव्य प्राशन केले. त्याचा परिणाम तीव्रतेने जाणवल्याने पाटील स्वत: येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. वैद्यकीय अधिकारी वालावलकर यांनी सर्व प्रथम पोलिसांना खबर दिली. रुग्णालयात पोलीस निरीक्षक शंकर कोरे व अन्य पोलिसांनी धाव घेतली. त्यांना लगेच पडवे येथील एसएसपीएम रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले.मात्र उपचार सुरू असतानाच रात्री ११.३० च्या दरम्यान त्यांचे निधन झाले.
पाटील हे मूळचे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील घुटखिंडगी गावच रहिवासी होते.पाटील यांनी पोलीस दलात दाखल होण्यापूर्वी ते सैन्य दलात कार्यरत होते. १५ वर्षे त्यांनी सैन्य दलात तोफगोळा विभागात काम केले. सेवानिवृत्ती नंतर ते पाच वर्षांपूर्वी पोलीस दलात दाखल झाले. गेली ३ वर्षे ते कुडाळ पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.