सावंतवाडी /-
येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर प्राथमिक शाळेमध्ये दरवर्षी अनेक प्रकारचे उपक्रम किंवा कार्यक्रम राबवले जातात,त्याचप्रमाणे या शाळेने काल रानभाज्यांचे प्रदर्शन भरवले. “चला जंगलची सफर करूया, रानभाज्यांची चव चाखुया….” असा संदेश देत इयत्ता- पहिली ते चौथीच्या मुलांनी सध्या पावसाळ्यात येणार्या विविध रानभाज्यांचे एकत्रीकरण करून त्याचे आकर्षक प्रदर्शन भरवले. या खत विरहित रानभाज्यांच्या माध्यमातून माणसाच्या शरीराला होणारे फायदे, शरीराला मिळणारे लोह, जीवनसत्वे याविषयी मुलांना माहिती जाणून घेता आली. या प्रदर्शनामध्ये टायकाळा, चिनी पाला, कुर्डू, पैठा, कंदमूळ, ओवा, शेवग्याचा पाला, माढा, हळद, सुरण पाला, पेऊगा, माठ, तेर, अळू, कडीपत्ता, गवती चहा, काळेअळू, एक पाणी भाजी, लालभाजी अशा प्रकारच्या अनेक माहीत नसणाऱ्या भाज्या प्रदर्शनात मांडण्यात आल्या. या प्रदर्शनाचे उद्घाटन कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडी चे प्राचार्य श्री. मानकर सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. सावंत सर तसेच श्री. डी. जी. वरक, श्री. अमित कांबळे, श्रीमती ज्योत्स्ना गुंजाळ, प्राची बिले, निकिता मुंज आदी शिक्षक उपस्थित होते. सदर प्रदर्शनाला सावंतवाडी केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती स्नेहा लंगवे यांनी भेट देऊन, शिक्षक व विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले. यावेळी या प्रदर्शनाचा लाभ प्राथमिक व माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी घेतला. सर्व शिक्षक तसेच पालक वर्गाने प्रशिक्षणाचा आस्वाद घेतला. या नावीन्यपूर्ण प्रदर्शनासाठी संस्था अध्यक्ष श्री शैलेश पै,सचिव डॉक्टर प्रसाद नार्वेकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले.
