कणकवली /-

कणकवली शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जनता कर्फ्यू चा निर्णय घेण्यात आला आहे. 1 ते 10 मे पर्यंत याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कणकवली शहरात कोरोनाची दिवसेंदिवस वाढत जात असलेली रुग्ण संख्या व त्याच पटीत वाढणारे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे मृत्यू हे भितीदायक असून, यावर नियंत्रण आणण्यासाठी 1 ते 10 तारीख पर्यंत दवाखाने व मेडिकल दुकाने वगळता सर्व पूर्णपणे बंद राहणार आहे. मात्र या कालावधीत कणकवलीत क्रिकेट किंवा अन्य खेळ खेळण्यासाठी एकत्र होणारे तरुण, वाढदिवस साजरा करण्यासाठी किंवा अन्य मनोरंजनासाठी एकत्र होणे हे देखील कोरोना वाढीच्या दृष्टीने धोकादायकच आहे. या दहा दिवस बंद कालावधीत अशा प्रकारे जर कोणी गर्दी केलेली आढळली तर त्यांच्यावर देखील कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. कणकवली शहरात कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठीच 1 ते 10 मे पर्यंत बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय जनतेच्या हितासाठी असून या निर्णयाला सर्वांकडून सहकार्य मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र मागील लॉकडाऊन चा अनुभव विचारात घेता वाढदिवस साजरे करणे, क्रिकेट स्पर्धा किंवा अन्य खेळ खेळणे या करिता होणारी गर्दी ही देखील कोरोना वाढीसाठी शहरात कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे शहरात असे एकत्र येणे टाळावे असे आवाहन नलावडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page