मसुरे /-

देवगड तालुक्यातील मुणगे आडवळवाडी येथील नंदकिशोर महाजन कुटुंबियांच्या मालकीच्या सहा महिने वयाच्या गोठ्यात बांधून ठेवलेल्या आणखी एक वासरावर बुधवारी पहाटे वाघाने हल्ला करत फडशा पाडला. केवळ पाच दिवसात या वाघाने महाजन यांच्या एकूण तीन वासरांचा फडशा पाडल्याने आर्थिक नुकसानी बरोबरच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. वनविभाग केवळ पंचनाम्याचा दिखावा करत असून हा परिसर या वाघापासून भयमुक्त करण्यासाठी वनविभागाकडून पिंजरा लावण्याची मागणी मुणगे ग्रामस्थानकडून केली जात आहे.
शुक्रवारी केला दोन वासरांवर हल्ला
पाच महिने वयाच्या गायीच्या दोन वासरांवर मागील शुक्रवारी पहाटे ३ च्या सुमारास वाघाने हल्ला करत एका वासरास ठार मारल्याने भीतीचे वातावरण पसरले होते. गुरुवारी रात्री सर्व जनावरे महाजन यांच्या घरा नजीकच्या गोठ्यात बांधलेली होती. कुत्र्यांच्या भुंकण्याचा मोठा आवाज आल्याने आवाजाच्या दिशेने कानोसा घेतला असता वाघ दृष्टीस पडला. आरडा ओरडा केला असता बिबट्या जातीच्या वाघाने एक वासरास तोंडात पकडत पोबारा केला. यानंतर गोठ्यात जाऊन पाहिले असता आणखी एक वासरू रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. वाघाने वासराचे डोके फोडल्या मुळे सुमारे पाच महिने वयाच्या जखमी वासरावर उपचार चालू करण्यात आले होते. परंतु या वासराचे सुद्धा उपचार चालू असताना सोमवारी निधन झाले.
अन तिसरे वासरू सुद्धा त्याचे भक्ष्य ठरले
बुधवारी पहाटे वाघाने आपला मोर्चा पुन्हा महाजन यांच्या गोठ्याकडे वळवून बांधून ठेवलेल्या वासराचा पोटाकडील बाजूने चावा घेत कोथळाच बाहेर काढल्याचे सकाळी दिसून आले.
याबाबत वनक्षेत्रपाल विलास मुळे याना संपर्क साधला असता पंचनामा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु या तीन वासरांपैकी एक वासराचे धड वाघाने नेल्याने सापडले नसल्याने मिळणाऱ्या आर्थिक नुकसानी पासून वंचितच रहावे लागणार आहे.
वनविभाग मनुष्य बळी जाण्याची वाट बघत आहे का?
सदर बिबट्या वाघ रक्तास चटावल्याने जनावरांवर हल्ले करता करता एखाद्या मनुष्यावर हल्ला करण्याची वनविभाग वाट पहात आहे का? असा सवाल ग्रामस्थां मधून विचारला जात आहे. वन विभागाचे टीम गावात पिंजऱ्या सह जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत त्या मृत वासरावर अंतिम संस्कार करण्यात येणार नसल्याचे समीर महाजन यांनी सांगितले आहे.
दरम्यान या बिबट्या वाघाची दहशत या भागात मागील काही महिने असून यापूर्वी सुद्धा असून अनेक जनावरांचा फडशा या वाघाने पाडला आहे. वनविभागाने तातडीने या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी मुणगे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page