वेंगुर्ला /-


वेंगुर्ले शिवसेना तालुका प्रमुख बाळु परब यांना पत्रकार परिषद घेऊन वेंगुर्ले तालुक्यातील शिवभोजन योजना बंद असल्याचे मान्य करावे लागले यातच भाजपाचा विजय असे आज सोमवारी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना ऊर्फ बाळु देसाई यांनी स्पष्ट केले.भाजपा तालुका कार्यालयात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्यासह तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,महिला तालुका अध्यक्षा स्मिता दामले,जिल्हा कार्यकारिणी सदस्य साईप्रसाद नाईक,ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर,मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर आदी उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना देसाई म्हणाले की,
शिवसेना तालुकाप्रमुख बाळु परब यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवभोजन योजना लवकरात लवकर वेंगुर्लेत सुरु करु असे सांगावे लागले म्हणजेच सद्यस्थितीत शिवभोजन योजना बंद असल्याचे मान्य केले .मुळात भाजपाची हीच तक्रार होती की, संपुर्ण महाराष्ट्रात शिवभोजन योजना सुरू आहे.परंतु वेंगुर्ले तालुक्यात ही योजना बंद असल्याने गोरगरीब जनता व परप्रांतीय मजुर यांना त्याचा लाभ मिळत नाही.शिवसेना तालुका प्रमुख बाळु परब यांनी शिवभोजन योजनेचा अभ्यास करावा.माजी सभापती म्हणून काम केलेले शिवसेना तालुका प्रमुख बाळु परब यांना माहिती नाही की शिवभोजन योजना ही लाॅकडाऊनपुर्ती मर्यादित नाही.ही योजना त्यांच्याच ठाकरे सरकारने जानेवारी २०२० मध्ये सुरू केली.या शिवभोजन योजनेची संपुर्ण महाराष्ट्रात सद्यस्थितीत ८९३ केंद्र सुरू आहेत,अशी कागदोपत्री आकडेवारी सांगते. सुरुवातीला ही योजना सुरू केली तेव्हा १० रुपयाला शिवभोजन थाळी उपलब्ध होती.परंतु गेल्या वर्षीच्या लाॅकडाऊन मध्ये सरकारने ५ रूपयांमध्ये शिवभोजन दिले व या वर्षी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लाॅकडाऊनच्या एक महिना कालावधीत मोफत शिवभोजन योजना चालू केली, याची माहिती पहिल्यांदा घ्यावी.
मुळात शिवसेना तालुकाप्रमुख बाळु परब यांना त्यांच्याच सरकारची शिवभोजन योजनेची माहिती नसणे म्हणजे शोकांतिका आहे.गतवर्षी वेंगुर्ले चे नगराध्यक्ष दिलीप गिरप व आम्ही पुढाकार घेतला नसता तर लाॅकडाऊन काळात सुद्धा ही योजना सुरू झाली नसती .याबाबत बाळू परब यांनी खातरजमा करण्यासाठी तहसीलदार कार्यालय – पुरवठा विभागाशी संपर्क साधावा .कारण नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी हे शिवभोजन लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वाहन व कर्मचारी नगरपरिषदेतर्फे उपलब्ध करून दिले होते.त्यामुळे परप्रांतीय मजुरांना लाॅकडाऊनच्या काळात शिवभोजन मिळु शकले होते. त्यावेळी सुद्धा तालुका प्रमुख बाळु परब यांनी टीका केली होती, की ‘आमच्या सरकारच्या योजनेचे भाजपाने श्रेय घेऊ नये’. परंतु बाळु परब यांना सांगावे लागते,की तुमच्या सरकारची लोकाभिमुख योजना संपुर्ण जिल्ह्यात किमान कागदोपत्री तरी सुरु आहेत, परंतु वेंगुर्ले तालुक्यात ही योजना पुर्णपणे बंद आहे.याला सत्ताधारी शिवसेनेचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी जबाबदार आहेत.कारण योजना बंद असल्याने गोरगरीब जनतेला त्याचा लाभ मिळत नाही, हे सत्ताधारी शिवसेनेचे अपयश आहे.बाळु परब यांनी शिवभोजन योजना सुरू करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले असते तर सर्वसामान्य गरीब लोकांचे आशीर्वाद मिळाले असते.दरम्यान शिवभोजन योजना म्हणजे लबाडाघरचे आमंत्रण ही टीकात्मक बातमी वृत्तपत्रांतून प्रसिध्द झाली, त्यावेळी शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली व लगेच शिवभोजन योजनेची जाहिरात प्रसिद्धी माध्यमातून द्यावी लागली, हेच सक्षम विरोधीपक्ष भाजपाचे यश आहे.
यावेळी बोलताना देसाई पुढे म्हणाले की,येथील आमदार – खासदारांच्या दुर्लक्षामुळे वेंगुर्ले तालुक्यातील आरोग्य यंत्रणा ढेपाळलेली आहे.आरोग्य विभागाकडे अपुरा मनुष्यबळ व साधनांचा अभाव असल्यामुळे वेंगुर्ले तालुक्यातील कंटेंटमेंट झोनमध्ये साधी जंतूनाशक फवारणी सुद्धा होत नाही.त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून भाजपाने वेंगुर्ले तालुक्यामध्ये स्थानिक ग्रामस्थ व युवक मंडळाना सोबत घेऊन निर्जंतुकीकरण मोहीम सुरू केली आहे.आतापर्यंत चार ते पाच गावात भाजपा च्या वतीने निर्जंतुकीकरण फवारणी पुर्ण केली आहे.तुळस पं.स.मतदार संघाचे विद्यमान सदस्य असलेल्या मतदारसंघात तुळस – बेहेरेवाडी येथील कंटेंटमेंट झोनमध्ये भाजपातर्फे व संजु विरनोडकर टीमच्या सहकार्याने संपुर्ण वाडी निर्जंतुकीकरण करण्यात आले, यावरुन यांच्या सरकारचे अपयश दिसून येते.शिवभोजन योजनेप्रमाणे ठाकरे सरकार कोव्हिड काळात सोयीसुविधा देण्यात कमी पडले,राज्यातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे,अशी टीका देसाई यांनी केली.ठिकठिकाणी ऑक्सिजनची कमतरता भासत आहे.तसेच कोव्हिड व्यक्तींना रेमडेसेवीर इंजेक्शन्स मिळत नाहीत.त्यामुळे ठाकरे सरकार जनतेला आरोग्य सुविधा, औषध पुरवठा,ऑक्सिजनचा पुरवठा, रुग्णांना उपचारासाठी बेड उपलब्ध करून देण्यात सपशेल अपयशी ठरले आहे,असेही देसाई यांनी म्हटले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार सेवाकार्य अधिक जोमाने आणि व्यापक करण्यासाठी तसेच कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी व योग्य निर्बंध पाळण्यासाठी गावा – गावातील युवक मंडळे व सामाजिक कार्यकर्त्यांना एकत्रित करून कोव्हिड अनुशासन कमिट्या बनविण्यात येणार आहेत,अशी माहिती प्रसन्ना देसाई यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page