भरारी पथकांमार्फत तपासणी आणि कारवाईला सुरुवात..!

सिंधुदुर्ग /-

जिल्ह्यातील अनधिकृत वाळू – उपसा व मायनिंग विरोधात आता कडक कारवाईला जिल्हा महसूल प्रशासनाने सुरुवात केली असून तशा सूचना जिल्हाधिकारी के.मंजुुुलक्ष्मी
यांनी महसूल व मायनिंग यंत्रणेला दिल्या असल्याचे समजते.

जिल्ह्यात गेले अनेक दिवस अनधिकृत मायनिंगचा विषय गाजतो आहे.विरोधी पक्ष विशेषतः ‘मनसे’ ने हा विषय लाऊन धरला आहे तर सत्तारूढ पक्षाचे ,सेनेचे नेते अतुल रावराणे यांनी या विषयाला सर्वप्रथम वाचा फोडली.परिणामी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.अखेर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्र्यांना या प्रश्नाची गंभीर दखल घ्यावी लागली आणि त्यांनी या संदर्भात कठोर कारवाई करण्याच्या सूचना महसूल यंत्रणेला दिल्या काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी वरील आदेश देत कडक कारवाईच्या सूचना दिल्या.

या बैठकीला सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, मायनिंगचे अधिकारी तसेच सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.सर्व तालुका पातळीवर तात्काळ भरारी पथके नेमून धडक तपासणी मोहीम हाती घेण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.तसेच जिल्ह्याच्या सर्व सीमा ‘ सील ‘ करण्यात येऊन त्या ठिकाणी कडक तपासणी करण्यासाठी भरारी पथके तैनात करावीत अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या सूचनेनुसार कालपासूनच कारवाई सुरू झाली आहे.यासंबंधात काही तक्रारी आल्यास आणि कारवाईच्या दरम्यान हलगर्जीपणा दिसून आल्यास संबंधित अधिकारी,कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी दिल्या.प्रामुख्याने ‘ अनधिकृत मायनिंग ‘ याच एका विषयावर सदर बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page