मसुरे /-

आपण शासनाला टॅक्स भरतो म्हणजे सारे काही सरकारने करायला हवे अशी एकंदर मानसिकता आपली सर्वांची बनली आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच रस्त्यांची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. त्यातच निधी अभावी साधे खड्डे सुद्धा भरले जात नाही आहेत. लोकप्रतिनिधीं कडून होणाऱ्या दुर्लक्षा मुळे अनेक अपघात खराब रस्त्यामुळे होत आहेत. निदान आपल्या भागात तरी होणाऱ्या रस्ते अपघातांना नियंत्रण मिळावे यासाठी सरकारी निधीची वाट न बघता मालवण तालुक्यातील पोईप येथील एक व्यक्ती मागील दोन महिन्यांपासून स्वकष्टाने श्रमदान करून रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे काम करत आहे. कुणाकडूनही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केवळ सामाजिक भान जपत काम करत आहेत ते मूळ डीकवल येथील परंतु सध्या पोईप वरची माधववाडी येथे राहणारे श्रीकृष्ण सखाराम धुरी! समाजात आज एकमेकांबद्दल असलेली आत्मीयता कमी होत असताना धुरी हे बजावत असलेली कामगिरी खरोखरच दखल घेणारी ठरली आहे.

*रस्ते अपघातानी मन उद्विग्न*

सरकारचा अपुरा निधी मिळत असल्याने सर्वच रस्ते खड्यानी भरून गेले आहेत. रस्त्याची खडी पृष्ठभागावर आल्याने मोटारसायकल घसरून अनेक ठिकाणी अपघात होत आहेत. याची खंत श्रीकृष्ण धुरी यांच्या मनात असल्याने सहृदयता दाखवत परिसरातील खड्डे मातीने भरून काढण्याचा त्यांनी निश्चय केला.
आपल्या बहिणीच्या घरी आई, वडील व मुलग्या सह राहून मोलमजुरी करणाऱ्या श्रीकृष्ण यांनी ध्येय समोर ठेवत परिसरातील एक एक रस्ता भरून काढण्यास प्रारंभ केला. विरण बाजारपेठ ते राठीवडे ग्रामपंचायत या बेळणे मार्गावर तर वडाचापाट शांतादुर्गा मंदिर ते थळकरवाडी पालव मांगर रस्ता, पोईप वेताळमुंजेश्वर मंदिर रस्ता, पालव मांगर ते पोईप नाका रस्ता, वडाचापाट ते गोळवण रस्ता आदी रस्त्यावरील खड्डे दगड, व मातीने बुजविले आहेत. तसेच वरती आलेली खडी सुद्धा भरून दुसरीकडे टाकल्याने अपघातांना आळा बसला आहे. त्यांच्या या समाजसेवी कार्याची दखल घेत पोईप ग्रामपंचायतीने नुकताच त्यांचा सत्कार केला आहे. तसेच काजू बागायतदार सुरेश नेरकर यांनी एक हजार रुपये रोख दिल्याचे धुरी यांनी सांगितले.

*आपल्याला कधी कळणार जबाबदारी ?*

उन्हा मध्ये काम केल्याने याचा विपरीत परिणाम धुरी यांच्या तब्येतीवर झाला असून सध्या त्यांना वैधकीय मदत घ्यावी लागत आहे. लोकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित प्रश्नावर सरकारकडून दिरंगाई होत असल्याने जनता लोकप्रतिनिधींना दूषणे देत असते. परंतु नागरिक म्हणून कधी तरी आपली सुद्धा काहीतरी जबाबदारी असते याचा मात्र आपल्याला विसर पडतो. साध्या साध्या गोष्टी साठी आपण सरकारवर अवलंबून राहू लागल्याने आपल्या जबाबदारींचा विसर पडू लागला आहे. पोईप येथील श्रीकृष्ण धुरी यांच्या कृतीने मात्र ५० किमी पेक्षा जास्त लांबीच्या रस्त्यावरील खड्डे बुजविले गेल्याने वाहन चालक त्यांचे आभार मानत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page