कारवाई न झाल्यास ५ हजार महिलांचे भव्य आंदोलन छेडण्याचा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ.संध्या तेरसे यांचा इशारा..

कुडाळ /-

संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या पूजा चव्हाण संशयास्पद मृत्यूप्रकरणी वादग्रस्त वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. भाजप महिला मोर्चाच्या वतीने आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी कुडाळ वेंगुर्ला रस्ता काही तास रोखून धरण्यात आला. त्यामुळे कुडाळ शहरातील वेंगुर्ला रस्त्यावर वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. राठोड यांच्यावर कारवाई न झाल्यास ५ हजार महिलांचे भव्य आंदोलन छेडण्याचा इशारा महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे यांनी दिला.

“निषेध असो, निषेध असो, ठाकरे सरकारचा निषेध असो”, “मुर्दाबाद, मुर्दाबाद ठाकरे सरकार मुर्दाबाद”, अशा दणाणून टाकणाऱ्या घोषणांनी सरकारचा निषेध करण्यात आला. कोविड 19 ची खबरदारी घेत आंदोलन यशस्वीपणे पार पाडले.

महिला मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष संध्या तेरसे म्हणल्या, “जर मुख्यमंत्री आपल्या वादग्रस्त मंत्र्यांचा राजीनामा घेत नसतील, तर त्यांनी स्वतःचा राजीनामा द्यावा. ते गुन्हेगारांना शासन करू शकत नसतील तर महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल, तर याला ठाकरे सरकार मधील मंत्री जबाबदार आहेत. वेळीच कारवाई झाली नाही तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन करू. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही जास्तीत जास्त महिलांना आज रस्त्यावर आणलं नाही. आठ दिवसांमध्ये वादग्रस्त मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई नाही झाली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातच 5000 महिलांचा महामोर्चाचे आयोजन करण्यात येईल,” असे त्या म्हणाल्या.

यावेळी कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे,नगराध्यक्ष ओंकार तेली, महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस सौ.रेखा काणेकर, नगरसेविका सौ अश्विनी गावडे, मंडल अध्यक्ष सौ आरती पाटील, शहराध्यक्ष सौ.ममता धुरी, उपाध्यक्ष सौ.मुक्ती परब, सौ.रंजना दळवी, सौ ग्रीष्मा कुंभार, सौ.अक्षता कुडाळकर, सौ.विशाखा कुलकर्णी, तेजस्विनी वैद्य, सौ.स्मिता दामले, सुप्रिया वालावलकर, वृंदा गवंडलकर, वनिता जुवेकर, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असंख्य महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या होत्या.

कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत भाजप महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांची धरपकड केली. सत्तेचा माज आलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महिलेसाठी न्याय मागणाऱ्या महिलांवर गुन्हे दाखल करण्यासाठी दबावतंत्र सुरु केले. महिलेचा अनादर करणाऱ्या रांझाच्या पाटलाला छत्रपती शिवरायांनी कठोर शासन केले होते. मात्र आज रांझाचे पाटीलच सत्तेवर बसून आयाबहिणींच्या अब्रूशी खेळात आहेत, नराधमांना पाठीशी घालत आहेत आणि न्याय मागणाऱ्या महिलांचा आवाज चिरडून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशा भावना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.त्यावेळी पोलीस स्थानकात जिल्हा अध्यक्ष राजन तेली,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ दिपलक्ष्मी पडते,नगरसेवक सुनील बांदेकर,कुडाळ शहराध्यक्ष राकेश कांदे,सोशल मीडिया युवा मोर्चा जिल्हा संयोजक राजवीर पाटील,पिंगुळी शहरअध्यक्ष अजय आकेरकर,युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष चंदन कांबळी,सचिन तेंडुलकर सह असंख्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page