आचरा /-

मुणगे आडबंदर सडा येथे रविवारी सकाळी ११ च्या सुमारास लागलेल्या आगीत आंबा बागांसह गुरांच्या चारया साठी साठवलेले गवतही जळून गेले.यात आचरा जामडूल येथील शेतकऱ्याचा मांगर जळून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. मिठबांव सरपंच भाई नरे यांच्या सहकार्याने आलेल्या कणकवली नगरपंचायतीच्या अग्निशामक बंबाने आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वारयामुळे आग पुन्हा भडकल्याने आचरा जामडूल,मुणगे आपय,आडबंदर भागातील ग्रामस्थ रात्री उशिरापर्यंत आग विझविण्यासाठी प्रयत्न करत होते. यात धरती आंबा कलमे जळून मांगरही भस्मसात झाल्याने शेतकऱ्यांचे लाखांचे नुकसान झाले आहे.

मुणगे आडबंदर सडा येथे आचरा जामडूल येथील ग्रामस्थांच्या बागा आहेत. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास लागलेल्या आगीत प्रमोद वाडेकर यांची २००आंबा कलमे, नित्यानंद पेडणेकर यांची २००आंबा कलमे, तसेच मांगरही जळून नुकसान झाले,नरेश आचरेकर, बाळा मसुरकर, सचिन सारंग, सुनील आचरेकर,प्रमोद वाडेकर आदी शेतकऱ्यांनी गुरांच्या चारयासाठी साठवून ठेवलेले गवत जळून गेल्याने त्यांचेही मोठं नुकसान झाले आहे.आगीची खबर मिळताच आचरा जामडूल येथील अर्जुन आचरेकर, गोविंद आचरेकर, अनिल आचरेकर, वसंत आचरेकर यांच्या सह मुणगे आडबंदर,आपय येथील ग्रामस्थांनी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.मात्र सोसाट्याच्या वारयामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते.याबाबतची माहिती गोविंद आचरेकर यांनी भाई नरे यांना देताच त्यांच्या पुढाकाराने कणकवली नगरपंचायतीचा अग्नीशामक बंब आणून आग विझविण्यात आली होती.मात्र वारयामुळे संध्याकाळी पुन्हा आग भडकली होती.घटनेची खबर मिळताच
मिठबाव पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक दशरथ चव्हाण, मुणगे सरपंच सौ साक्षी गुरव, पोलीस पाटील सौ साक्षी सावंत, उपसरपंच धर्माजी आडकर, यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page