वेंगुर्ला /-

पेट्रोल – डिझेल – गॅसचे दर वाढवून जनतेला लुटणा-या केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून काँग्रेस संघर्ष करेल,अशी प्रतिक्रिया इर्शाद शेख यांनी प्रसिद्धीस दिली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमी असताना केंद्र सरकार नफेखोरी करत जनतेला लुटत आहे. पेट्रोल डिझेलची शंभरी (१००) कडे वाटचाल सुरू आहे. तर घरगुती गॅस सिलिंडरचा दर आठशे पर्यंत पोहोचला आहे. सर्व आर्थिक पातळीवर अपयशी ठरलेले हे सरकार जनतेला लुटण्याचे काम करत आहे. पेट्रोल डिझेलच्या प्रचंड दरवाढीमुळे महागाईत प्रचंड वाढ झाली आहे. युपीए सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडले असताना ७० रुपये पेट्रोलचा दर झाल्यावर गळा काढणारे व टिवटिव करणारे आता मुग गिळून गप्प बसले आहेत. परंतु काँग्रेस पक्ष जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करेल. केंद्र सरकारने केलेली ही भरमसाठ वाढ ताबडतोब मागे घ्यावी व जनतेला दिलासा द्यावा,अशी काँग्रेसची मागणी आहे.यावेळी बोलताना इर्शाद शेख म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव युपीए सरकारच्या काळात १२० डाॅलर प्रति बॅरलच्या आसपास पोहोचला असताना डाॅ.मनमोहनसिंगांच्या युपीए सरकारने पेट्रोल ७५ रुपये आणि डिझेल ६२ रुपयांच्यावर जाऊ दिले नाही. परंतु आज कच्च्या तेलाचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारात ५२ ते ५५ डाॅलर प्रति बॅरल असताना ही जनतेची लुट मोदी सरकारने का चालवलेली आहे? हा आमचा प्रश्न आहे. जर या सरकारला योग्य प्रकारे अर्थनीती राबवता येत नसेल तर देशातील १३० कोटी लोकसंखेला सरकार दावणीला का बांधत आहे आणि या लुटलेल्या जनतेच्या पैशाचे या मोदी सरकारने केले तरी काय ? असा प्रश्न इर्शाद शेख यांनी उपस्थित केला असून केंद्रातील भाजपचे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे,अशी प्रतिक्रिया सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते इर्शाद शेख यांनी बोलताना दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page