मसुरे /-

छंद, कला मानवाच्या जीवनाला आनंद देतात. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला लावतात. कला ही उपजत असावी लागते. आणि या अंगभूत कलेसाठी वेळ दिल्यास उत्तमोत्तम कलाकृती हातून घडून जातात. देवगड तालुक्यातील मुणगे येथील असाच एक छंद वेडा महाविधालयीन शिक्षण घेणारा युवक आपले शिक्षण सांभाळून पेन्सिलच्या रेषांनी चेहरे कागदावर बोलके करतोय. नव्हे त्यात जिवंतपणा आणतोय. पेन्सिलच्या सहाय्याने स्केच करताना आवश्यक रेषांचा स्ट्रोक, आणि चेहऱ्याची प्रमाणबद्धता यातून नामांकित चित्रकारांच्या तोडीस तोड कलाकृती साकारतोय प्रणय देवदत्त पुजारे हा युवक !
*शालेय जीवनापासून चित्रकलेची आवड*
कोणतीही कला भाषा, प्रांत या पलीकडे जाऊन सर्व बंधने झुगारते. कलेची आवड असणारा कला उपासक आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करतो आणि नावलौकिक मिळवतो. प्रणय याला सुद्धा शालेय जीवनापासून चित्रकलेची आवड. महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबई गाठल्या नंतर पेन्सिलच्या सहाय्याने फेमस चेहरे कागदावर उतरण्याचा त्याला छंद जडला. बारावी नंतर मेडिकल सायन्स क्षेत्रात प्रवेश करूनही त्याने हा छंद जपला होता.आयटीएम कॉलेज पनवेल येथे बॅचलर ऑफ सायन्स एन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिच्या द्वितीय वर्षी तो सध्या शिक्षण घेत आहे. “पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्हाला का जगायचं हे सांगून जाईल.”असं खुद्द पु.ल. सांगून गेले आहेत.पु. ल. देशपांडे यांच्या याच ओळी प्रणय याला या कलेकडे ओढले जाण्यासाठी टर्निंग पॉईंट ठरल्या आहेत.
*छंदातून जीवनाचा आनंद मिळतो*
कोरोना महामारीच्या काळात कॉलेज ऑन लाइन झाल्यावर तर प्रणय कडे भरपूर वेळ त्याच्या या छंदा साठी होता. मुंबई वरून गावी आल्यानंतर नियमित पणे वेळ घालविण्याचे साधनच त्याचा पेन्सिल स्केच बनविणे हा छंद बनला आहे. मुळात पेन्सिल स्केच हा आपला विचार शारीरिक किंवा डिजिटलरित्या त्वरीत कागदावर उतरवण्याचा एक चांगला मार्ग आहे. आजवर अनेक थोर क्रीडापटू, सिने कलाकार, राजकीय नेते, ऐतिहासिक व्यक्ती यांची अगदी हुबेहूब चित्रे त्याने पेन्सिलच्या सहाय्याने रेखाटली आहेत. रिकामा किंवा फुरसतीचा वेळ घालविण्यासाठी, मनोरंजनासाठी, त्याचप्रमाणे हौस किंवा विरंगुळा म्हणून माणूस जे जे काही करतो, ते सर्व छंदात मोडते.
*कलेमध्ये नवनवीन सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील*
प्रणय विविध कलाकृती स्केच करुन सोशल मीडिया वर पोस्ट करायचा. त्याला तेथे चांगला प्रतिसाद मिळू लागल्या नंतर या कलेचा एकदम बारकाईने तो अभ्यास करत आहे. कुणाचेही मार्गदर्शन नसताना त्याने रेखाटलेली चित्रे प्रोफेशनल आर्टिस्टला सुद्धा तोंडात बोटे घालायला लावणारी ठरत आहेत. या कलेमध्ये नवनवीन सुधारणा करण्याचा नक्कीच प्रयत्न त्याचा भविष्यात असणार आहे. त्याचा स्वतःचा यु ट्यूब चॅनेल असून त्याच्या अनेक कलाकृती इन्स्टाग्राम, फेसबुक या ठिकाणी पहायला मिळतात. प्रसिद्ध भजनीबुवा, बांधकाम व्यावसाईक आणि सामाजिक कार्यकर्ते देवदत्त उर्फ आबा पुजारे यांचा प्रणय हा मुलगा असून अभ्यासामध्ये सुद्धा तो तितकाच हुशार आहे.
मोकळा वेळ योग्य रीतीने कारणी लागण्यासाठी एखादा छंद असणे चांगले असते. छंदामुळे मनोरंजन होते, ज्ञानात भर पडते. मानसिक समाधान किंवा निर्मितीचा आनंद छंदाच्या द्वारे मिळविता येतो. मुणगे गावच्या या सुपुत्राच्या पेन्सिल स्केच करण्याच्या छंदाला पुढील काळात नक्कीच उभारी मिळून अनेक उत्तमोत्तम कलाकृती कागदावर निर्माण होतील यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page