रेडी ग्रामपंचायत च्या वतीने माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना निवेदने..

वेंगुर्ले /-

वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथील श्री गणपती मंदिर समुद्र किनारी जेटी बांधून सुशोभीकरण करण्यात यावे,अशी मागणी रेडी ग्रा.प.च्या वतीने रेडी सरपंच रामसिंग उर्फ भाई राणे व जि.प.सदस्य प्रितेश राऊळ यांनी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.तसेच टाटा मेटॅलिक्स बंद प्रकल्पबाबत,रेडी तलाव सुशोभिकरण करण्याबाबत निवेदन सादर करण्यात आली आहेत.
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू नुकतेच सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना त्यांनी वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा येथे भेट दिली.यावेळी रेडी ग्रा.प.च्या वतीने सरपंच रामसिंग उर्फ भाई राणे यांनी तीन निवेदने सादर केली आहेत.यावेळी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई,भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,रेडी ग्रा.प.सदस्य विनोद नाईक, गायत्री सातोस्कर, शैलेश तिवरेकर, राणी नरसुले,तसेच पुरुषोत्तम राणे, सुदेश पिळणकर आदींसह ग्रामस्थ,वेंगुर्ला तालुक्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.”जगभर ख्याती पावलेले रेडी येथील श्री गणपती मंदिर” परिसर नजीक सुंदर मनमोहक असा समुद्रकिनारा असून येथे मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात.तसेच रेडी येथे अन्य पर्यटन स्थळे असून त्याठिकाणी पर्यटकांना व भाविकांना समुद्रमार्गे यावयाचे झाल्यास जेटी उपलब्ध नाही.त्यामुळे सदर ठिकाणी जेटी बांधून त्याचे सुशोभिकरण झाल्यास मोठ्या प्रमाणात भाविक व पर्यटक येतील.जेटीचे बांधकाम पूर्ण झाल्यास स्थानिकांना बोटिंगचा व्यवसाय सुरू करून उत्पन्नाचे साधन निर्माण होईल.यामुळे रेडी गणपती मंदिर समुद्रकिनारी जेटी बांधून सुशोभीकरण करण्यात यावे,अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.रेडी तलाव सुशोभीकरण ,जलक्रीडा, जलसफारी झाल्यास हे स्थळ जिल्ह्यातील उत्तम पर्यटन केंद्र होऊ शकते.सदर तलाव सुशोभीकरण करणेबाबत निवेदन देण्यात आले आहे.तसेच टाटा मेटॅलिक्स बंद प्रकल्पाबाबत निवेदन देण्यात आले आहे.रेडी गावच्या विकासाला चालना देणारा प्रकल्प बंद झाल्याने रेडीसह जिल्ह्यातील हजारो लोक बेरोजगार झाले.हॉटेल व्यावसायिक, ट्रक वाहतूक व्यावसायिक यांच्या व्यवसायावर मंदी आलेली आहे.
सदर प्रकल्प सुरू होणे आवश्यक आहे.प्रकल्पासाठी पूरक सेवा सुविधा उपलब्ध आहेत.सदर प्रकल्पाला सर्व ग्रामस्थांचे सहकार्य मिळेल.याठिकाणी नवीन प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करावेत,असे निवेदन देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page