सावंतवाडी -माडखोल येथील समृद्धी दुग्धव्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन ..

सावंतवाडी /-

सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे.शिवरामभाऊ जाधव यांना अपेक्षित काम सतिश सावंत यांच्याकडून होत आहे.शेतीबरोबरच दुग्धक्रांती झाल्यास शेतकरी सुखी होईल,त्यावेळी कोकण सुखी होईल.कोकण व विदर्भ असा फरक केला जाऊ नये.कोकणच्या प्रगतीसाठी राज्यशासनाने पुढाकार घेतल्यास कोकणचा सर्वांगीण विकास होईल,असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांनी माडखोल येथे केले.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सिंधुदुर्ग, भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान झाराप व देसाई डेअरी माडखोल यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी तालुक्यातील माडखोल – टेम्बवाडी येथील समृद्धी दुग्धव्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन आज सकाळी माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते फीत कापून व दीपप्रज्वलनाने झाले.यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत,सिंधुदुर्ग जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष एम.के.गावडे,जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा परब,भगिरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.प्रसाद देवधर,सहा.निबंधक संस्था(दुग्ध) ओरोसचे कृष्णकांत धुळप,
उद्योजक प्रशांत कामत,माजी जि.प.अध्यक्ष रेश्मा सावंत,पं. स.सदस्या सुनंदा राऊळ,मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई,देसाई डेअरी फार्मचे प्रोप्रा.प्रभाकर देसाई,माडखोल सरपंच संजय शिरसाट,माडखोल विकास संस्था अध्यक्ष दत्ताराम कोळमेकर,संचालक आत्माराम ओटवणेकर,माजी संचालक डी.बी.वारंग आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना केसरकर म्हणाले की,चांदा ते बांदा ही योजना काही काळासाठी बंद होती.याबाबत शरद पवार यांनी ठरविल्यास रत्नसिंधू म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात राबविली जाईल.शेतीबरोबरच गायी – म्हैशीपालन,अन्य व्यवसाय केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून पर्यटकही येतील व कृषी पर्यटनासाठी पूरक ठरेल.एम.के.गावडे यांनी तसेच प्रज्ञा परब यांनी काथ्या उद्योग युनिट्स च्या माध्यमातून खूप मोठा रोजगार उपलब्ध केला आहे.भगिरथ प्रतिष्ठानने जसे कार्य सुरू ठेवलेय,तसेच देसाई यांच्याप्रमाणेच तशीच विकासाची क्रांती येथील शेतकऱ्यांच्या शेतावर येवो,असे केसरकर बोलताना पुढे म्हणाले.

यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना सतिश सावंत म्हणाले की,जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी समृद्ध होण्यासाठी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.येथील प्रशिक्षण झाल्यानंतर लोन देणे सुलभ होईल.येथील प्रशिक्षणाचा योग्य लाभ घ्या.शेतीबरोबरच दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळी-मेंढी पालन आदी पूरक व्यवसाय केल्यास शेतकरी सक्षम होईल.सर्वांचेच सहकार्य लाभल्यास २- ३ वर्षात सावंतवाडी तालुका दूध उत्पादकचे मॉडेल बनेल,असे सावंत म्हणाले.
सावंतवाडी तालुक्यात दुग्धव्यवसाय वाढीसाठी पतपुरवठा करावयाचा असून यासाठी जिल्हा बँकेचे पूर्ण सहकार्य राहील,असे सावंत म्हणाले.केसरकर यांच्या माध्यमातून चांदा ते बांदा योजनेचा फायदा येथील जनतेला झाला,असेही त्यांनी म्हटले.

यावेळी बोलताना कृषिभूषण एम.के.गावडे म्हणाले की,पश्चिम महाराष्ट्रापेक्षा चांगले वातावरण सिंधुदुर्गात आहे.त्यामुळे शासनाकडून आणखीन भरीव सहकार्य अपेक्षित आहे.देसाई,तसेच भगिरथ प्रतिष्ठानचे डॉ.देवधर यांच्या ग्रामविकासचा उपयोग करून घ्या,असेम्हणाले.यावेळी बँक ऑफ इंडिया ही अग्रणी बँक असूनही शेतकऱ्यांना अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने शेतकरी प्रगती करू शकत नाही,अशी खंत गावडे यांनी व्यक्त केली.

यावेळी बोलताना डॉ. प्रसाद देवधर म्हणाले की,ग्रामीण भागात उद्योग सुरू झाल्यास गावाचा विकास होईल.शेतीला पूरक व्यवसायाची जोड देणे आवश्यक आहे.येथील प्रशिक्षण केंद्राचा उपयोग करून घ्या.जिल्हा बँक लोन उपलब्ध करून तसेच भगिरथ प्रतिष्ठानचे संपूर्ण सहकार्य राहील,असे सांगितले. प्रभाकर देसाई,कृष्णकांत धुळप,प्रशांत कामत यांनीही विचार व्यक्त केले.यावेळी प्रशिक्षणार्थीनी प्रॉपर प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा,असे विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस दिपक केसरकर व सतिश सावंत यांचा सत्कार करण्यात आला.तसेच मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून सहा शेतकऱ्यांना दुधाळ जनावरांच्या कर्जाचे चेकचे वाटप करण्यात आले.यावेळी विविध संस्था मान्यवर,पदाधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक अनिरुद्ध देसाई,सूत्रसंचालन व आभार शरद सावंत यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page