मालवण /-

स्वातंत्र्यपूर्व काळात मुलींच्या शिक्षणासाठी महात्मा जोतिबा फुलेंच्या साथीने सावित्रीबाई फुले यांनी जे कार्य केले ते अतुलनीय असेच होते. त्यावेळच्या समाजाने मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या सावित्रीबाईंचा अनन्वित छळ केल्याने सावित्रीबाईंसमोर मुलींचे शिक्षण हे एक आव्हान बनले होते मात्र ते आव्हान त्यांनी समर्थपणे स्वीकारल्याने मुलींना शिक्षणाची द्वारे खुली झाल्याने आज समाजात सावित्रीच्या लेकी म्हणून आपण महिला मानाने जगत आहोत. सावित्रीबाई फुले हे समस्त महिला वर्गासाठी नव्हे तर संपूर्ण समाजासाठी ते आदर्शवत व्यक्तिमत्व होते. या व्यक्तिमत्त्वाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने वाटचाल केली तर आपले आयुष्य समृद्ध बनेल असे प्रतिपादन मालवणच्या पोलीस उपनिरीक्षक शीतल पाटील यांनी येथे बोलताना केले.

मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय येथे सावित्रीबाई फुले यांच्या १९० व्या जयंतीनिमित्त महिला शिक्षण दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटक व प्रमुख पाहुण्या म्हणून पोलीस उपनिरीक्षक पाटील या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका सौ. एस. एस. टिकम, शिक्षिका सौ. सुजाता देऊलकर – यादव, सौ. अनुष्का कदम, अभिनेत्री श्रीमती सुजाता शेलटकर, कोरोना योद्धा सौ. स्नेहा हरमलकर, सौ. सविता पटकारे, सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी तेजस्विता करंगुटकर, मत्स्यव्यवसायिक आणि विद्यार्थिनी कु. लिखिता मालंडकर आदि उपस्थित होत्या. प्रारंभी पोलीस उपनिरीक्षक शीतल पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रशालेच्या शिक्षिका सौ. पी.जी. मेस्त्री यांनी स्वागत तर सौ. ए. ए. वाईरकर यांनी प्रास्ताविक केले. उपस्थित पाहुण्यांचा आणि सत्कारमूर्तींचा परिचय सौ. संजना सारंग यांनी करून दिला.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक शीतल पाटील म्हणाल्या, आज व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला आहे. सोशल मीडियाचा वापर करताना तो काळजीपूर्वक केला पाहिजे. आज पोलीस अधिकारी म्हणून काम करत असताना गुन्ह्याच्या प्रमाणाकडे पाहिले तर सोशल मीडियामुळे निर्माण झालेले गुन्ह्यांचे प्रमाण हे अधिक आहे. आज जसा सोशल मीडियाचा चांगला फायदा आहे तसेच त्याचे दुष्परिणामही अधिक आहेत. १८ वर्षाखालील मुली ज्यावेळी सोशल मीडियाचा वापर करतात त्यावेळी काहीजण चुकीच्या गोष्टींमुळे अडचणीत सापडतात. कायद्याने जरी मुलींना संरक्षण असले तरी प्रत्येक मुलीने, महिलांनी काय चूक, काय बरोबर हे ठरवले पाहिजे. ज्याप्रमाणे आपली मैत्रीण असते त्याप्रमाणे मुलींनी आपल्या आईला मैत्रीण बनवावे, तिच्याशी संवाद साधावा तसे केल्यास जीवनातील बरेच प्रश्न सुटतील असे सांगत त्या पुढे म्हणाल्या, कोणता स्पर्श चांगला व कोणता वाईट हे ओळखण्याची देणगी जणू मुलींना प्राप्त झालेली असते. त्याचा वापर मुलींनी करावा. आयुष्य हे आपल्याला एकदाच मिळत असते. ते जगताना समाजात स्वतःचे स्थान निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी ध्येय डोळ्यासमोर ठेवून शिक्षक व वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाने आपले आयुष्य सुखकर बनवावे असेही त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रशाळेच्या माजी मुख्याध्यापिका सौ. एस. एस. टिकम यांनी संपूर्ण स्त्री जगतासमोर तसेच समाजासमोर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या आदर्श आहेत, त्यांनी महिलांना शिक्षण मिळावे म्हणून अपार कष्ट घेतले. त्यांनी सुरू केलेला शिक्षणाच्या रथाचा गाडा आपल्याला पुढे न्यायचा आहे सावित्रीच्या लेकी म्हणून आज आपण समाजात चांगल्या रीतीने वावरत आहोत. सावित्री बाईंनी हाकलेला हा शिक्षणाचा रथ यापुढे अविरत पुढे नेला पाहिजे असे त्या म्हणाल्या.

यावेळी व्यासपीठावरील मान्यवर महिलांचा शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशालेच्या विद्यार्थिनी पुर्वा परब,, कृती गोसावी तसेच सत्कारमूर्ती सुजाता यादव, अनुष्का कदम, सुजाता शेलटकर, तेजस्विता करंगुटकर यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका कु. सुनंदा वराडकर यांनी तर आभार सौ. सरोज बांदेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक हणमंत तिवले, प्रफुल्ल देसाई, अरविंद जाधव व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page