कुडाळ /-

कुडाळ पंचायत समितीची मासिक सभा आज १ जानेवारीला संपन्न,लाॅकडाऊन काळात बंद असलेली कुडाळ पंचायत समितीची मासिक सभा पंचायत समितीच्या सभागृहात सभापती नुतन आईर यांच्या अध्यक्षतेखाली तब्बल १० महिन्यांनी संपन्न झाली. यावेळी उपसभापती जयभारत पालव, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई,पंचायत समिती सदस्य राजन जाधव, डाॅ. सुबोध माधव, अरविंद परब, संदेश नाईक, गोपाळ हरमलकर, बाळकृष्ण मडव, पंचायत समिती सदस्या श्रेया परब, प्राजक्ता प्रभु, निलिमा वालावलकर, स्वप्ना वारंग, सुप्रिया वालावलकर, मथुरा राऊळ, अनघा तेंडोलकर व अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा सभापतीच्यां केबीन मध्ये लावण्यात आलेला फोटो आताच्या सभापतीनी का काढला? यामागे नेमकं कारण काय? असा सवाल माजी सभापती राजन जाधव यांनी कुडाळ पंचायत समितीच्या सभेत उपस्थित करीत डाॅ. आंबेडकर यांचा फोटो सभापती केबीन मधुन काढायचा नाही असा ठराव घेण्यात यावा असे सांगितले.तर पाट ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत शौचालय अनुदान वाटप झाले त्या सर्व अनुदान वाटपाची सखोल चौकशी करण्यात यावी असा ठराव घ्या अशी मागणी पंचायत समिती सदस्य डाॅ.सुबोध माधव यांनी केली. या दोन्हीही मुद्द्यावरून सभागृहात चांगलाच गदारोळ झाला.

या सभेच्या सुरूवातीलाच कुडाळ एसटी डेपो नुतन इमारतीचा लोकापर्ण केल्याबद्दल आमदार वैभव नाईक यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात यावा असे राजन जाधव यांनी सांगताच भाजपाचे अरविंद परब यांनी सांगितले की, सदरच्या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर सभापतीचे नाव नाही, प्रोट्रोकाॅल पाळला गेला नाही, स्थानक इमारत अपुर्णावस्थेत आहे त्यामुळे हा अभिनंदन ठरावाला विरोध असल्याचे सांगताच राजन जाधव व अरविंद परब यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली.

आयत्यावेळी येणार्या विषयात बोलताना राजन जाधव यांनी सांगितले की, ते सभापती असताना त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो सभापती केबीन मध्ये लावला होता तो फोटो आताच्या सभापतीनी का काढला? यामागे नेमकं कारण काय? या बाबत सभापती नुतन आईर यांनी सांगितले की, आम्ही अवमान केलेला नाही. तो फोटो काढुन ठेवला आहे आता तो आम्ही लावु असे सांगितले. यावर जाधव यांनी डाॅ. आंबेडकर यांचा फोटो सन्मानपुर्वक लावण्यात यावा व पुन्हा सभापती केबीन मधुन काढायचा नाही असा ठराव घ्यावा असे सांगितले.

पंचायत समितीच्या 15 वित्त आयोगाच्या निधीचे वाटप करताना सभापतीनी स्वतासाठी 7 लाखांचा निधी ठेवला आणि बाकीच्या सदस्यांना कमी निधी दिला आहे त्यामुळे हे निधी वाटप चुकीचे आहे असा आरोप राजन जाधव यांनी करीत कमी निधी मध्ये मतदार संघात कशी काय विकास कामे कुठे करायची? तर पंचायत समिती सदस्य 18 असताना 20 सदस्य आराखड्यात कसे दाखविले? असा प्रश्न प्राजक्ता प्रभु यांनी उपस्थित केला. या बाबत विजय चव्हाण यांनी सांगितले की, अगोदरच्या बैठकीत हा आराखडा मंजूर झाला होता. 18 सोडुन दुसरे सदस्य नसुन प्रशासनाच्या वतीने दोन कामे सभापती यांच्या माध्यमातून घेण्यात आली असल्याची माहिती दिली.

पाट ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांनी दि. 1 एप्रिल 2014 ते दि. 31 मार्च 2017 या कालावधीत स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत शौचालय अनुदानाचे सुमारे 1 लाख 17 हजार निधी खर्च केला. मात्र या प्रकरणी आताच्या सरपंचाना या बाबत नोटीस का बजावण्यात आली? हा प्रकार म्हणजे हे प्रकरण दडपण्याचा व चोर सोडुन सन्याशाला फाशी देण्याचा प्रकार आहे असा आरोप सुबोध माधव यांनी करीत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी असा ठराव घेण्यात यावा असे सांगितले. तर तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकावर नुकसान भरपाई लावा अशी मागणी जाधव यांनी केली. आम्ही पण या एका शौचालयाच्या विषयावरून कंटाळलो आहोत हा विषय लवकर मार्गी लावा असे संदेश नाईक यांनी सांगितले.

या बाबत विजय चव्हाण यांनी सांगितले की, या प्रकरणी चौकशी करीता नेमण्यात आलेल्या दोन विस्तार अधिकारी यांच्या अहवालानुसार तत्कालीन सरपंचाना ही नोटीस बजावली त्यांनी वकीला मार्फत उत्तर दिले मात्र ते अमान्य करण्यात आले आहे. व तत्कालीन ग्रामसेवक यांनी केलेली चुकी ही गंभीर आहे त्यामुळे त्याच्यावर कारवाईचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.

पाट देसाईवाडी येथे नळयोजनेसाठी 14 लाखाचा निधी खर्च केला मात्र नळ योजना अस्तित्वात नाही असे असताना त्यावर 14 लाखाचा निधी खर्च केला कुठे? या बाबत सर्व माहिती द्या असे डाॅ. सुबोध माधव यांनी सांगितले.

कोव्हीड लस येत्या दोन आठवड्यानंतर येणार असुन तालुक्यातील 2 हजार 38 जणांना लस देण्यात येणार असुन यामध्ये पोलिस, महसुल, कोव्हीड संबंधित काम करणारे अधिकारी, कर्मचारी, 50 वर्षावरील तसेच आजारी व्यक्ती यांना सुरूवातीच्या काळात लस देण्यात येणार आहेत. सर्व आरोग्य केंद्रात एमबीबीएस डाॅक्टर नेमावेत अशी मागणी संदेश नाईक यांनी दिली.गुरानां आलेल्या नवीन रोगाबाबत सर्वे आणि जनावरांना लसीकरण सुरू केले असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकार्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page