भाजपा सोशल मीडिया प्रदेश सदस्य अविनाश पराडकर यांचा सवाल..

सिंधुदुर्ग /-

“बुंद से गयी वो हौद से नही आती” अशी एक म्हण आहे. पण जिथे हौद भरूनच इज्जत निघून गेली, तिथे राहीलेल्या ‘बुंद’ भराचे काय करायचे, असा प्रश्न शिवसेनेचे कोकणातले मंत्री मा.उदयजी सामंत आणि खासदार मा.विनायकरावजी राऊत या महान विभूतींना नक्कीच पडला असेल. आता आमदार राजन साळवी यांच्या प्रतिमा जाळण्याची कितीही रचना लावली, तरी बदललेले वारे आता नेमकी कुठच्या दिशेने आग वाढवत नेणार आहे, हे आता जवळपास सर्वांच्याच लक्षात आले आहे, अशी टीका अविनाश पराडकर यांनी सामंत-राऊत द्वयीवर केली आहे.

मुळातच, या प्रकल्पाला विरोध करणे म्हणजे कर्मदरिद्रीपणा आहे. सगळीकडेच विकासाच्या प्रकल्पाना विरोध करणाऱ्या काही आंतरराष्ट्रीय शक्ती आहेत. प्रचंड खोटे गैरसमज पसरवून या प्रकल्पाविरोधात वातावरण तयार करण्यात त्या चांगल्याच यशस्वी झाल्या. तापलेल्या तव्यावर पोळी शेकून घेण्यासाठी खासदार राऊत आणि मंत्री उदय सामंत यांनी प्रकल्पविरोधाची कास धरली खरी, पण त्यामुळे म्हातारी तर मेलीच, वर काळ चांगलाच सोकावला. प्रदूषण नियंत्रणाचे नवे आंतरराष्ट्रीय निकष पाळणारा, तीन लाख कोटींची गुंतवणूक आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष तीन लाख लोकांना रोजगार देऊ शकणारा एक सोन्यासारखा प्रकल्प बदनाम झाला. त्याची अधिसूचना रद्द करून घेण्यासाठी या कोकणच्या लोकप्रतिनिधींनी निवडणुकीत युतीची बोलणीदेखील पणाला लावली.
आठवतच नसेल, तर खासदार विनायक राऊत यांनी स्मरणशक्तीला जरा ताण देऊन पाहावे. मग, रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेत कोकणचा भाग्यविधाता ठरणारा हा ग्रीन रिफायनरी प्रकल्प आपणच आणत असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली असल्याचे त्यांना नक्की आठवेल. यु-ट्यूबवर आजही ती पत्रकार परिषद आस्तित्वात आहे.

फक्त काहींच्या स्वार्थी राजकारणापायी या प्रकल्पाला विरोध केला गेला. असा महत्वाकांक्षी प्रकल्प आणण्यासाठी आणि राबवण्यासाठी ज्यांनी द्रष्टेपण व हिंमत दाखवली, त्यांचा उल्लेख दलाल म्हणून केला गेला. काहींवर ग्रामव्यवस्थेचा गैरवापर करत बहिष्कार टाकण्याचे घृणास्पद प्रकार झाले. सारेच दुर्दैवाचे दशावतार होते.
अर्थात, शिवसेनेच्या उच्चस्तरीय वरिष्ठ नेतृत्वाला या प्रकल्पाची गरज आणि महत्व माहीत नव्हते असे मुळीच नव्हते. अनेक अभ्यासु खासदार या प्रकल्पाची शिफारस मातोश्रीला करत होते. त्यातूनच, कधीतरी पाठी वळण्याची वाट मोकळी ठेवण्याची सावधगिरी दाखवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी “जनतेला प्रकल्प नको असेल तर होणार नाही” अशी भूमिकाच प्रत्येक वेळी घेतलेली दिसेल. याचाच अर्थ, ज्यावेळी जनतेला प्रकल्प हवा असेल त्यावेळी तो करण्याची भूमिका ही दस्तरखुद्द मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखांचीच आहे असे म्हंटले तर ते वावगे होणार नाही. मग राजन साळवी यांची प्रतिमा जाळणे, म्हणजे खुद्द आपल्या मुख्यमंत्री तथा संघटना प्रमुखांच्या भूमिकेलाच चूड लावण्यासारखे नाही का? सगळेच राऊत हे संघटना आणि पक्षप्रमुखांपेक्षा मोठे होऊ लागलेत की काय असा प्रश्न आता सर्वसामान्य शिवसैनिकांना पडू लागला आहे.
शिवसेना आमदार राजन साळवी यांची नाणार समर्थनाची भूमिका ही देखील एका सामान्य शिवसैनिकच्या व्यथेला जाणून त्यातून घेतलेली भूमिका आहे. आपल्या मतदार संघातील शिवसैनिक आणि शिवसेना पदाधिकारी रोजगाराच्या संधीअभावी कसे कर्जबाजारी होत चालले आहेत हे ते अगदी जवळून जाणतात. पक्षाची भूमिका हाच आदेश मानणारा त्यांच्यातला शिवसैनिक प्रत्येक वेळी जागा राहिला. प्रकल्प विरोधकांकडून आपली टर उडवली जात असतानाही हा शिवसेनेचा वाघ मूक राहिला, आपल्या मतदारसंघाचे सोने करू शकणारा प्रकल्प नजरेसमोरून हिरावून घेतला जात असतानाही गप्प राहिला, आजवर वर्षानुवर्षे सगळ्या संघर्षात साथ देणारे आपले पदाधिकारी पक्षातून काढले जात असतानाही त्याने सहन केले. पण…
लॉकडाऊन नंतर युवा वर्गाच्या पोटात भडकलेली जीवघेणी भूक आणि वर्षानुवर्षं मतदार संघाला शापासारखी ग्रासलेली बेरोजगारी यावर आता दुर्लक्ष करणे कोणत्याही लोकप्रतिनिधीला परवडणारे नाही, हे आमदार राजन साळवी यांनी पक्के जाणले. जनतेची भूमिका परखडपणे मांडणे ही त्यांची जबाबदारी होती, त्यांचे ते आद्य कर्तव्य होते. उशिरा का होईना, पण “हीच ती वेळ” आमदार साळवीनी साधली आणि हे ऐलान केले.
आपल्या प्रतिमा जाळण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत, हे जाणूनही ते शांत आहेत. कारण एकतर गेल्या काही महिन्यात शपथपत्रावर आपली जागा प्रकल्पासाठी देत असलेल्या स्थानिक जनतेच्या प्रकल्प समर्थनाचे ते सगळ्यात जवळचे साक्षीदार आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका हे पक्षविरोधी बंड नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शब्दांचे त्यांना करून दिलेले एकप्रकारे स्मरणच आहे, आणि जनतेच्या हिताच्या प्रश्नावर ठाम उभे राहण्याच्या हिंदुहृदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीचे ते आचरण आहे. त्यामुळेच आपल्या प्रतिमा जाळल्या जात असतांनाही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आदेश देत सच्चा शिवसैनिकाची भूमिका पुन्हा एकदा पार पाडली आहे. त्यांच्यातल्या कडव्या शिवसैनिकाला खरेच सलाम आहे. दुर्दैवाने “राऊत-पॅटर्न” राजकारणातुन अशा शिवसैनिकांवर अन्यायच होणार असेल, तर त्यांनी भाजपामध्ये यावे असे आवाहन भाजपा आमदार नितेश राणे यांनी केले आहे. हिंदुत्व आणि विकास यासाठी आता फक्त भाजपाच पर्याय आहे, हे सिद्ध करण्याची सुपारीच घेतलेले शिवसेनेतले सुपारीबाज भविष्यात कदाचित तीच वेळ आमदार साळवी यांच्यावर आणतील असे दिसते. पण भविष्यात युवा रोजगाराच्या मुद्द्यावर यापेक्षा वेगळी भूमिका घेऊन कोणालाही कोकणात स्थान मिळणार नाही, हे कोकणी जनता नक्कीच दाखवून देईल. फक्त काही काळ त्यासाठी वाट पहावी लागेल एवढेच! कोकणी जनता बेरोजगारीच्या काळ्या दगडालाच भविष्यात उखडून टाकणार आहे, मग त्यावरच्या पिचक्या पांढऱ्या रेषांची हैसीयत ती काय, असा उपरोधिक सवाल पराडकर यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page