वेंगुर्ला /-

सध्या निशाण तलावातून शहराला पाणीपुरवठा होत असून माहे एप्रिल अखेर पर्यंत पाणी पुरेल एवढा पाणीसाठा आहे.त्यामुळे १ जानेवारीपासून शहरातील नागरिकांना २ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आज झालेल्या सभेत ठरले.
वेंगुर्ला नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा आज मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे,नगरसेवक सुहास गवंडळकर,धर्मराज कांबळी,श्रेया मयेकर,दादा सोकटे, प्रशांत आपटे,प्रकाश डिचोलकर,कृतिका कुबल,कृपा मोंडकर,स्नेहल खोबरेकर, शितल आंगचेकर, पूनम जाधव,सुमन निकम आदी उपस्थित होते.
शहरात काही ठिकाणी पाणी वाया जात असल्याचे निदर्शनास आले आहे.याबाबत पाणी वाया जाऊ नये याबाबत कर्मचारी पाठवून लक्ष पुरवावे.प्रथमतः संबंधितांना समज देण्यात यावी,अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे नगराध्यक्ष यांनी सूचित केले.शहरात पाईपलाईनचे काम सुरू असून जे नळकनेक्शन धारक आहेत,त्यांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा,अशी सूचना श्रेया मयेकर यांनी मांडली.शहरात जेथे व्यवस्थित पाणीपुरवठा होत नाही,त्याठिकाणी सर्व्हे करण्यात यावा,अशी सूचना सुमन निकम यांनी मांडली.याबाबत संबंधित ठिकाणी पाहणी करून कार्यवाही करण्याची सूचना नगराध्यक्ष यांनी पा. पु. विभागाला दिली.शहरात आवश्यक ठिकाणी नाल्यावर बंधारे घालण्याची सूचना उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ यांनी मांडली.
न.प.कंपोस्ट डेपो येथे उद्भवत असलेली दुर्गंधी बाबत नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.याबाबत अस्वछता बाबत न.प.कडून पाहणी करण्यात यावी,अशी अस्मिता राऊळ यांनी मागणी केली.याबाबत सभागृहात चर्चा झाल्यानंतर उद्या बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता नगराध्यक्षसह सर्व सदस्य यांनी भेट देण्याचे ठरले.वेंगुर्ला मच्छिमार्केटचे काम किती पूर्ण झाले आहे? असा सवाल उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ यांनी उपस्थित केला.याबाबत इलेक्ट्रिक वर्क व लिफ्टसुविधा इ. काम लवकरच पूर्ण करून २६ जानेवारी रोजी मच्छिमार्केट सुरू करण्यात येईल,असे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी सांगितले.
स्वच्छ सर्वेक्षण २०२१ च्या दृष्टीने शहरात स्वछता अभियान आणखी प्रभावीपणे राबविण्यासाठी विविध उपक्रम राबविणे आवश्यक असल्याचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी सुचविले.त्यानुसार शनिवारी सकाळी ७ ते ९ वा. या वेळेत लाईटहाऊस ते दाभोलीनाका तसेच कॅम्प परिसरात स्वछता अभियान राबविण्याचे ठरले.
स्वच्छ भारत सर्वेक्षण अंतर्गत मोड्युलर टॉयलेट साठी प्रत्येक सदस्यांनी आपापल्या वोर्डमध्ये जागा सुचवाव्यात,असे नगराध्यक्ष यांनी सूचित केले.मल्टिपर्पज हॉल कधी सुरू होणार? याबाबत दादा सोकटे यांनी प्रश्न उपस्थित केला.याबाबत उर्वरित कामे पूर्ण झाल्यावर ३१ मार्च २०२१ पर्यंत उदघाटन होईल,असे नगराध्यक्ष यांनी स्पष्ट केले.मागील सभेत सदस्यांत झालेल्या जोरदार खडाजंगीमुळे सदस्यांनी सभागृहात योग्य भाषेत व कायद्याच्या चौकटीत राहून बोलावे,अन्यथा कारवाई करण्यात येईल,असे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी स्पष्ट केले.१४ व्या वित्त आयोगातून प्राप्त शिल्लक निधीतून विकासकामे करण्यात यावी,अशी सूचना प्रशांत आपटे यांनी मांडली.तसेच पाणीटंचाई निवारणार्थ न.प.चा टँकर घेण्याबाबत आपटे यांनी सूचना मांडली.यावेळी सुहास गवंडळकर,कृतिका कुबल,स्नेहल खोबरेकर, शितल आंगचेकर आदी सदस्यांनी विविध सूचना मांडल्या.यावेळी नवीन बांधकाम नियमावली,शासकीय परिपत्रक यांचे वाचन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page