मेरठ : उत्तर प्रदेशात अध्यादेशाद्वारे लागू करण्यात आलेल्या वादग्रस्त धर्मांतरविरोधी कायद्यावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान आणखी एका जोडप्याची अडवणूक करण्यात आल्याचं समोर येतंय. मेरठमध्ये दोन वेगवेगळ्या धर्मांच्या तरुण-तरुणीच्या विवाहानंतर वाद निर्माण झाला आहे.

मेरठमध्ये एका मुस्लीम तरुणीनं हिंदू मुलासोबत मंदिरात विवाह केलाय. विवाहानंतर ‘फराह’ (२४ वर्षीय) नावाच्या या मुलीनं आपलं नाव बदलून ‘माही’ केलंय.

मिळालेल्या माहितीनुसार, नमन मदान एक केकचं दुकान चालवतो. तो फराहच्या घरी अनेकदा येत-जात होता. दीड वर्षांपूर्वी फराह-नमनची ओळख झाली होती. त्यानंतर या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं.

सुरुवातीला ही गोष्ट फराहच्या घरी माहीत पडली तेव्हा तिला घरातून बाहेर पडायला कुटुंबीयांकडून बंदी घालण्यात आली.मात्र, १३ डिसेंबर रोजी दोघांनी गुपचूपपणे घरातून बाहेर पडत ऋषिकेशच्या एका मंदिरात विवाह केला. लोकेशन ट्रेस करत पोलिसांनी दोघांचा माग काढला आणि या जोडप्याला एका हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ डिसेंबर रोजी फराहच्या भावाकडून नमन मदानवर आपल्या बहिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिचं अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला होता.तर दुसरीकडे, हिंदू जागरण मंचाकडून नमनचंच अपहरण झाल्याचा दावा करत पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घालण्यात आला.त्यानंतर मेरठ पोलिसांनी मदनचं लोकेशन ट्रेस करत या जोडप्याला ऋषिकेशमध्ये गाठलं. त्यानंतर पोलीस त्यांना मेरठला घेऊन आलेत.

कुटुंबाकडून जीवाला धोका

फराहनं प्रियकर नमन मदान याच्यासोबत ऋषिकेशच्या एका मंदिरात विवाह केलाय. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, फराहनं आपल्या कुटुंबीयांसोबत जाण्यास नकार दिलाय. सोबतच आपल्याच कुटुंबीयांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचंही तिनं म्हटलंय. आपण सज्ञान असून स्वत:च्या इच्छेनं मदनसोबत विवाह केल्याचं फराहनं म्हटलंय.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page