मुंबई: बॉलीवुडचं ड्रग्ज रॅकेट  उघड करण्यासाठी एनसीबीला  मोठं यश मिळण्याची चिन्हं आहेत. कारण शंभरपेक्षा जास्त गॅजेटसमधून डेटा हस्तगत करण्यात एनसीबीला यश आलंय. यात दिपिका पादूकोण, अर्जून रामपाल, सारा अली खान, रिया चक्रवर्ती, श्रद्धा कपूर अशांच्या मोबाईल आणि इतर गॅजेटसचा समावेश आहे. या सगळ्या सिताऱ्यांच्या चौकशीत जे काही एनसीबीनं जप्त केलेलं होतं त्याची तपासणी गांधीनगरच्या एफएसएलमध्ये करण्यात आली. त्यात जवळपास पाचशे एचडी मुव्ही इतक्या मोठ्या प्रमाणात डेटा मिळवण्यात यश आलंय.

यामुळे आता कोणता ड्रग्ज पेडलर, कोणत्या अभिनेत्याच्या किंवा हिरोईनच्या संपर्कात होता तेही उघड होईल. तसच अनेक कलाकारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यताही वर्तवली जातेय. करण जोहरवर एनसीबीनं मोर्चा वळवल्यामुळे अगोदरच बॉलीवुडमध्ये खळबळ उडालीय. त्यात आता एवढ्या मोठ्या प्रमाणात डेटा रिकव्हर करण्यात यश आल्यामुळे आणखी काही धागेदोरे एनसीबीला मिळणार आहेत.

एनसीबीची करण जोहरला नोटीस
करण जोहरने होस्ट केलेल्या एका पार्टीत कलाकारांनी ड्रग्जचं सेवन केल्याचा आरोप शिरोमणी अकाली दलाचे आमदार मनजिंदर सिंह सिरसा यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोलाकडे (NCB) तक्रार केली होती. याप्रकरणी एनसीबीने सप्टेंबरमध्ये करण जोहरला नोटीस बजावली होती.

करण जोहरने आयोजित केलेल्या एका पार्टीत अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. याच पार्टीमधला एका व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, अभिनेता विक्की कौशल, शाहिद कपूर, दीपिका पादुकोण, मलायका अरोरा, अर्जुन कपूर आणि वरुण धवनसह अनेक कलाकार दिसून आले होते. या पार्टीमध्ये सर्व कलाकारांनी अमली पदार्थांचे सेवन केले असल्याचा दावा शिरोमणी अकाली दलाचे आमदार मनजिंदर सिंह सिरसा यांनी केला होता.

करण जोहरने एनसीबीला काय उत्तर दिले?
या नोटीसनंतर करण जोहरने एनसीबीला उत्तर दिले होते. सोशल मीडियावर कलाकारांचा पार्टीतला एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. मात्र, हा व्हिडीओ ज्या मोबाईलने काढला होता तो व्हिडीओ हरवला आहे, अशी माहिती करण जोहरने एनसीबीला दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page