नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणातील आरोपपत्रात चारही आरोपींविरुद्ध सीबीआयनं सामूहिक बलात्कार आणि हत्येचा आरोप दाखल केलाय. दलित मुलीच्या हत्येप्रकरणी तपास सोपवण्यात आलेल्या सीबीआयनं शुक्रवारी न्यायालयासमोर हाथरस प्रकरणासंदर्भातील आरोपपत्र दाखल केले.

आरोपींचे वकील मुन्ना सिंह पुंढीर यांच्या म्हणण्यानुसार, सीबीआयनं चारही आरोपी संदीप, लवकुश, रवि आणि रामू यांच्यावर सामूहिक बलात्कार आणि हत्येचा आरोप केलाय. सीबीआयनं आरोपींविरुद्ध एससी / एसटी कायद्यान्वयेही गुन्हा दाखल केलाय.

सीबीआयनं दाखल केलेल्या आरोपपत्रात कलम ३०२ (हत्या), एससी-एसटी कायदा, कलम ३७६ (बलात्कार), कलम ३७६ डी (सामूहिक बलात्कार) आणि कलम ३७६ ए (बलात्कार किंवा विकृत परिस्थितीमुळे मृत्यू) या गुन्ह्यांचा समावेश केलाय.

१४ सप्टेंबर रोजी हाथरसमधील एका गावात कथितरित्या सामूहिक बलात्कार आणि शारीरिक अत्याचार झालेल्या २० वर्षीय पीडितेचा दिल्लीतील रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. ३० सप्टेंबर रोजी तिच्या गावी पोलिसांनीच तिच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीशिवाय पीडितेचा मृतदेह जाळला होता. यासाठी पोलिसांवर सर्वच स्तरांतून टीका करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी मात्र, कुटुंबीयांच्या इच्छेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा दावा केला होता.

ऑक्टोबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयानं केंद्रीय चौकशी एजन्सी सीबीआयद्वारे करण्यात येणाऱ्या चौकशीची देखरेख करण्याची जबाबदारी अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे सोपवली होती.

दुसरीकडे, हाथरस प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप ठाकूर याने उत्तर प्रदेश पोलिसांना एक पत्र लिहून, आपल्याला तसंच इतर तीन आरोपींना या प्रकरणात गुंतवलं जात असल्याचा दावा केला होता. पीडितेच्या आई आणि भावावर त्याने अत्याचाराचा आरोप या पत्राद्वारे केला होता. ‘आपल्याला न्याय मिळावा’ अशी मागणीही त्याने केली होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page