मुंबई : विरार, चांदवड, औरंगाबाद आणि नाशकात आज भीषण अपघात झाले . या वेगवेगळ्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर, तब्बल 23 जण जंभीर जखमी झाले आहेत.
पहिला अपघात : मुंबई-आग्रा महामार्गावर तीन गाड्यांचा भीषण अपघात
चांदवडला मुंबई-आग्रा महामार्गावर मजूर घेऊन जाणारी खाजगी बस, गॅस सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक आणि टॅक्सी यांचा विचित्र भीषण अपघात झाला. अपघातानंतर बस महामार्गाच्या कडेला एका टॅक्सी आणि 2 टपऱ्यांवर पलटी होवून पडली. या अपघातात मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर बसमधील सुमारे 75 मजूर सुदैवाने बचावले आहेत.

यापैकी काही मजुरांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना चांदवडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दाट धुक्यामुळे अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातात 2 टपऱ्या आणि टॅक्सीचा चक्काचूर झाला आहे.

दुसरा अपघात : भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरची टेम्पो आणि रिक्षाला जोरदार धडक
मुंबई अहमदाबाद महामार्गावर विरार हद्दीतही भीषण अपघात झाला. भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने उभ्या टेम्पो आणि रिक्षाला जोरदार धडक दिली. विरार हद्दीतील सकवार परिसरात मुंबई लेनवर पहाटे 3 च्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेत चालकासह चार जण जखमी झाले आहेत.

तर, कंटेनर, टेम्पो आणि रिक्षा रस्त्यावर पलटी झाले असून, टेम्पोतील बिसलरीच्या पाण्याच्या बॉटल रस्त्यावर पडल्या. टायर फुटल्याने बिसलरी भरुन असणारा टेम्पो मुंबई लेनवर उभा होता. पाठीमागून आलेल्या कंटेनरने भरधाव वेगात येऊन, टेम्पो आणि समोरील रिक्षाला उडविले. याबाबत विरार पोलीस ठाण्यात प्राथमिक गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

तिसरा अपघात : औरंगाबादेत पिकअप व्हॅन नदीच्या पुलावरुन खाली कोसळली
औरंगाबाद जिल्ह्यातील ईसारवाडी फाट्यावरही भीषण अपघात झाला आहे. येथे एक पिकअप व्हॅन नदीच्या पुलावरुन खाली कोसळून हा अपघात झाला. या अपघातात 9 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 9 महिलांना घेऊन पिकअप व्हॅन औरंगाबादकडे निघाली होती. वेगावरील नियंत्रण सुटल्यामुळे पिकअप थेट पुलाखाली कोसळली. जखमी महिलांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

चौथा अपघात : मुंबई-नाशिक महामार्गावर 3 गाड्यांचा भीषण अपघात, 10 जण जखमी
मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर जवळ एटी महामंडळची बस, इनोव्हा आणि कंटेनर या 3 गाड्यांमध्ये भीषण अपघात झाला. अपघातात बसमधील चालक-वाहकसह 10 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 4 प्रवाशी आहेत. जखमींवर शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून चार प्रवाशांना उपचारासाठी नाशिक येथे पाठवण्यात आले आहे. तर 2 प्रवाशांना ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

इनोव्हा गाडीमध्ये मुंबई कोर्ट येथील नाशिकचे विशेष सरकारी वकील अजय मिसर असून ते किरकोळ जखमी झाले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page