विवाहाच्या वचनामुळे महिलेने प्रदीर्घ काळापर्यंत शारीरिक संबंध ठेवले असतील तर तो बलात्कार मानता येणार नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण गुरुवारी दिल्ली हायकोर्टाने नोंदवले आहे. एका बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने हे निरीक्षण नोंदवले आहे. लग्नाचे वचन हे प्रदीर्घ आणि अमर्याद वेळेपर्यंत शारीरिक संबंधांसाठी आमिष म्हणता येणार नाही, असेही कोर्टाने म्हटले आहे.

विवाहपूर्व काळात काही महिला परपुरुषाशी शरीरसंबंध ठेवतात, असे आढळून येते. कारण अशा महिलांना सदर पुरुषाने विवाहाचे वचन दिलेले असते. मात्र, नंतर काही कारणाने हा विवाह होऊ शकला नाही, तर अशा महिला त्या पुरुषाविरोधात बलात्काराचा अथवा लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करतात. मात्र, हे संबंध प्रदीर्घ काळापर्यंत प्रस्थापित झाले असतील तर बलात्काराचा गुन्हा मानता येणार नाही, असा निर्वाळा दिल्ली हायकोर्टाने दिला आहे.

दिल्ली हायकोर्टाने या संदर्भात एका महिलेची याचिका फेटाळली आहे. एका महिलेने तिला लग्नाचे वचन देऊन शरीरसंबंध प्रस्थापित करणार्‍या व्यक्तीच्या सुटकेला आव्हान दिले होते.

न्यायमूर्ती विभू बाखरु म्हणाले की, जर पीडिता काही क्षण शरीरसंबंध ठेवण्यास तयार झाली असेल तर लग्नाचे आमिष दाखवून ते ठेवल्याचे आपण म्हणू शकतो. तसेच काही प्रकरणांमध्ये महिलेची इच्छा नसतानाही लग्नाचे वचन महिलेला शरीरसंबंध ठेवण्यास प्रेरित करु शकते. केवळ अशा प्रकरणांमध्ये लग्नाचे वचन देऊन बलात्कार केल्याचे आपण म्हणू शकतो. तो कलम 375 अंतर्गत बलात्काराचा गुन्हा ठरू शकतो. पण जेव्हा दीर्घ काळासाठी शारीरिक संबंध ठेवले गेले असतील तेव्हा ते ऐच्छिक असल्याचे सिद्ध होते. न्या. बाखरु यांनी यावेळी ट्रायल कोर्टाने दिलेला निर्णय कायम ठेवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page