वेंगुर्ला /-

कोकणच्या या पवित्र भूमीत अनेक अदृश्य शक्ती विविध रुपात वास करताना आढळतात. तिच्यावर श्रद्धा असणाऱ्यांना याची प्रचिती येते. अशाच प्रकारची दैवी शक्ती म्हणजेच दक्षिण कोकणातील जागृत व प्रसिद्ध देवस्थान वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड- पेंडुर येथील श्री देव घोडेमुख…. यावर्षी हा जत्रोत्सव धार्मिक विधींनी संपन्न होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून हा जत्रोत्सव आज १८ डिसेंबर रोजी संपन्न होत आहे.

शिवाचे एक रूप म्हणजेच मार्तंड. मार्तंड रुपात खंडोबाने अनेक वर्षे राना वनात काढली. कोकण पट्यात अनेक ठिकानी या मार्तंड भैरवरूपी मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात. यापैकीच एक जागृत व प्रसिद्ध देवस्थान म्हणजे मातोंड- पेंडुर चा श्री देव घोडेमुख. भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या शिवमार्तंडेश्वराचे हे वस्तीस्थान आहे. ३६० चाळ्यांचा अधिपती, भूत पिशाच्यागण यांचा नायक म्हणून याचा याठिकाणी याचा वास आहे. या सरसेनापती श्री देव घोडेमुखचा जत्रोत्सव हा कोंब्यांची जत्रा म्हणूनही प्रसिद्ध आहे. या जत्रोत्सवाचा सोहळा म्हणजे भाविकांसाठी एक पर्वणीच.

हिरवाईने वेढलेले व काहीशा सखल भागात वसलेले मातोंड व पेंडूर हे दोन्ही गाव. काही वर्षांपूर्वी मातोंड या गावचे विभाजन होऊन पेंडूर हा महसुली गाव जरी वेगळा झाला असला तरी या दोन्ही गावच देवस्थान मात्र एकच. या गावातील श्री देव घोडेमुख मंदिर दुरवरूनही दिसते. निसर्गरम्य परिसर व डोंगराच्या एका टोकावर वसलेल्या या मंदिराचे दर्शन दूरवरून भाविकांना होते. मंदिराच्या प्रवेशद्वारापासून ७०० ते ८०० मीटर अंतरावर डोंगरात हे मंदिर आहे. आबालवृद्ध भाविक श्रद्धेने हा डोंगर पार करून श्री देव घोडेमुखचे दर्शन घेतात.

भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या या श्री देव घोडेमुखाची ख्याती सर्वदूर पसरली आहे. शरीराच्या कोणत्याही अवयवाचे दुखणे असेल तर याठिकाणी नवस बोलला जातो. हा नवस फेडताना त्या अवयवाच्या मातीची प्रतिकृती त्या देवाला वाहिली जाते. हजारो भाविक या देवाच्या चरणी नवस फेडण्यासाठी येतात.श्री देवी सातेरी पंचायतन देवस्थानची ख्याती ही सर्वदूर पसरली आहे. देवदीपावली दिवशी मातोंड येथील सातेरी मंदिरात मांजरी बसते. यानंतर सलग ४ दिवस या मंदिरात जागर होतात. पाचव्या दिवशी म्हणजेच घोडेमुख जत्रोत्सवा दिवशी गावकर मंडळी व इतर मानकरी सातेरी मंदिरात जमून मेळेकरी, भूतनाथ, पावणाई या तरंग काठ्यांसह घोडेमुख देवस्थानकडे मार्गस्थ होतात. सुमारे १० किलोमीटर पायपीठ करून या देवस्वाऱ्या घोडेमुख जत्रोत्सवाच्या ठिकाणी पोचल्यानंतर खऱ्या अर्थाने या जत्रोत्सवाला सुरुवात होते. डोंगर चढून तरंग देवस्वाऱ्या मंदिरात गेल्यानंतर सालाबात धार्मिक विधी संपन्न होतात व यानंतर गावकरी व इतर मानकाऱ्यांसह गावचा कोंब्याचा मान येथील चाळ्यांंना देतात.यानंतर भाविकांनी आणलेल्या सुमारे १० ते १५ हजार कोंब्यांंचा बळी या चाळ्यांंना दिला जातो.म्हणूनच ही जत्रा “कोब्यांचीजत्रा” म्हणून प्रसिद्ध आहे. सायंकाळी ६ च्या सुमारास तरंग देवता अवसरी मंदिरकडून मागे परतल्यानंतर या जत्रोत्सवाची सांगता होते. मातोंड व पेंडुर गावच्या इतिहासात हे देवस्थान म्हणजे मानाचा तुरा आहे. श्री देव घोडेमुखचा कृपाआशीर्वाद असाच सदैव ग्रामस्थांवर, भविकांवर राहो हीच आजच्या जत्रोत्सवादिवशी घोडेमुख चरणी प्रार्थना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page