लंडन /-

अनिश्चित काळात सोन्याहून झपाट्याने वाढणाऱ्या ‘बिटकॉईन’ या आभासी चलनाच्या किमतीने आज नवा रेकॉर्ड केला आहे. पहिल्यांदाच बिटकॉईनने २० हजार डॉलरची पातळी ओलांडली आहे.जागतिक बाजारात आज एका बिटकॉईनचा भाव २० हजार डॉलरवर गेला असून तो २०४४० डॉलर (भारतीय चलनात १५ लाख ३४६७ रुपये) इतके आहे. करोना संकट काळात बिटकॉईनचा प्रवास भल्याभल्या गुंतवणूकदारांना तोंडात बोटे घालायाला लावणार आहे. भारतात तूर्त सर्व प्रकारच्या आभासी चलनांच्या गुंतवणुकीवर, व्यवहारांवर आणि जवळ बाळगण्यावर बंदी आहे. मात्र जागतिक बाजारात बिटकॉईन रोज नवनवे विश्वविक्रम करत आहे. आज या क्रिप्टोकरन्सीमध्ये ४.५ टक्क्यांची वाढ झाली आणि एका बिटकॉईनचा भाव २०४४० डॉलर इतका झाला. विशेष म्हणजे याच वर्षात बिटकॉईनचे मूल्य १७० टक्क्यांनी वाढले आहे. मार्च महिन्यात बिटकॉईनचे मूल्य ५००० डॉलरच्या आसपास होते. सोने दरात होत असलेली घसरण आणि अस्थिरता यामुळे गुंतवणूकदारांनी आपला मार्ग बिटकॉईनकडे वळवला आहे. त्यामुळे बिटकॉईनने गगन भरारी घेतली आहे. एका बिटकॉईनची किंमत तब्बल १५ लाख रुपयांवर गेली असल्याचे चलन विश्लेषकांनी सांगितले. सोने, शेअर, स्थावर मालमत्ता या सारख्या मालमत्तामध्ये आता हळूहळू डिजिटल करन्सी गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय होत आहे. ऑक्टोबरमध्ये बिटकॉइनमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आहे. त्यातुलनेत सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. ज्यामुळे बिटकॉईनचे महत्व वाढले आहे, असे जे. पी मॉर्गन चेस या संस्थेचा अंदाज आहे. रिझर्व्ह बँकेने काही महिन्यांपूर्वी आभासी चलनाबाबत बँकांना निर्देश दिले होते. मात्र, त्यामध्ये या चलनावर संपूर्ण बंदी घातली आहे किंवा काय याविषयी सरकार निर्णय जारी झाला नव्हता. आता मात्र संपूर्ण बंदीचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. आभासी चलनावर बंदी घालण्यासाठी वेगळा कायदा आणला जाणार असून, त्याचे प्रारूप केंद्रीय अर्थ मंत्रालयाने तयार केले आहे. हे प्रारूप विविध मंत्रालयांकडे सल्लामसलतीसाठी पाठवण्यात आले आहे. एप्रिल २०१८मध्ये रिझर्व्ह बँकेने देशातील सर्व बँकांना उद्देशून एक परिपत्रक जारी केले. त्यामध्ये व्यवहारांना पाठिंबा देणाऱ्या सेवा देऊ नयेत, असे सांगितले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page