ठाणे : सार्वजनिक ठिकाणी वावरताना महिलांची कुंचबना होऊ नये या उद्देशाने शहराच्या विविध भागात सुमारे 10 कोटी रुपये खर्च करुन महापालिकेने अर्बन रेस्ट रुम उभारली. मात्र, या रेस्ट रुमची देखभाल आणि सुरक्षा करण्यासाठी कंत्राटदार नेमण्याची तसदीच पालिकेने घेतलेली नाही. त्यामुळे 28 पैकी केवळ 7 रेस्ट रूमचा वापर महिलांना करता येतोय. उर्वरित रेस्ट रुमला टाळे लागले असून स्वच्छतागृहांचे अक्षरशः उकिरडे झालेले दिसत आहेत.
ठाणेकर करदात्यांच्या पैशांची प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या संगनताने सुरु असलेल्या या उधळपट्टीचा निषेध करण्यासाठी भाजपच्या महिला जिल्हा अध्यक्षा नगरसेविका मृणाल पेंडसे यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करण्यात आले. महापालिकेने बांधलेल्या रेस्ट रुम तात्काळ सुरु झाल्या नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी पेंडसे यांनी दिला.

महिलांसाठी उभारण्यात आलेल्या वॉश कम रेस्ट रुममध्ये बायो डायजेस्टिव्ह पद्धतीने प्रसाधनगृह, चेंजिंग कम फीडिंग रूम, सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग मशिन, सॅनेटरी नॅपकीन इन्सेनरेटर आणि एटीएम सेंटर अशा सुविधा देण्याचे नियोजन होते. प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे योजनेच्या मूळ उद्देशाचे मातेरे झाल्याचा आरोप पेंडसे यांनी केला आहे.

ठाणे महापालिकेने आपल्या निधीतून बांधलेल्या 16 पैकी 14 रेस्ट रुम गेल्या दोन वर्षापासून बंद आहेत. तर, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बांधलेल्या 12 पैकी 07 रेस्ट रुमला आजही टाळे लागले आहे. या दोन्ही कामांवर सुमारे 10 कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, या सुविधेचा वापरच महिलांना करता येत नाही. हा गैरकारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी आज मृणाल पेंडसे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या महिला मोर्चाने घोडबंदर भागातील मानपाडा येथील अर्बन रेस्टरुम जवळ आंदोलन केले. यावेळी महापालिकेतील भ्रष्टाचार थांबलाच पाहिजे, रेस्टरुम सुरु झालीच पाहिजे अशा घोषणाही महिलांनी दिल्या.

लहानग्यांना स्तनपान करता यावे, यासाठी असलेल्या जागांमध्ये सध्या घाणीचे साम्राज्य दिसते. कुठे बसण्यासाठी केलेले बाकडे चोरीला गेले आहेत, तर कुठे जाळ्याच चोरल्या आहेत. येथील सीसीटीव्ही चोरीला गेले असून जे आहेत त्यावर मातीचे थर साचलेले दिसतात. सत्तेच्या जोरावर खर्चीक प्रकल्प ठाणे महापालिकेत मंजूर केले जातात. त्यासाठी कोट्यावधी रुपये कंत्राटदारांच्या खिशात घातले जातात. परंतु, प्रत्यक्षात निधी कुठे जातो?, योजनेचा उद्देश साध्य झाला आहे की नाही? याचा गंधही पालिकेला नसतो, असा आरोप पेंडसे यांनी यावेळी केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page