मालवण /
माजी पालकमंत्री आ. दीपक केसरकर यांच्या माध्यमातून चांदा ते बांदा योजनेअंतर्गत मालवण तालुक्यातील तळाशील-तोंडवळी येथे भूमिगत वीज वाहिन्या करण्याचे काम मंजूर करण्यात आले.यासाठी ९४ लाख ८७ हजार रु. चा निधी मंजूर करण्यात आला. या कामाचे भूमिपूजन आज खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
तळाशील-तोंडवळी भागात समुद्रकिनारपट्टी मुळे येणाऱ्या खाऱ्या वाऱ्यांमुळे वीज वाहिन्यांमध्ये वारंवार बिघाड होत असतो. हे पर्यटन स्थळ असल्याने वीज खंडित झाल्याने वेगवेगळ्या समस्या निर्माण होत होत्या त्यावर उपाययोजना म्हणून माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यातून तळाशील-तोंडवळी येथे भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला असून हे काम प्रत्यक्षात सुरू करण्यात आले आहे.

यावेळी खा. विनायक राऊत म्हणाले पर्यटन दृष्ट्या विकसित होत असलेल्या तळाशील-तोंडवळी या गावामध्ये विजेची समस्या गंभीर आहे.त्यामुळे याठिकाणी भूमिगत विद्युत वाहिन्यांना मंजुरी देण्यात आली. संपूर्ण कोकणातल्या किनारपट्टीवरील सर्व गावांमध्ये ६५० कोटी रु खर्च करून भूमिगत वीज वाहिन्या करण्याचे काम येत्या वर्षभराच्या काळात केले जाणार आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपण व आ. वैभव नाईक यांनी चर्चा केली आहे. विद्युत विषयक कामे करताना आचरा विद्युत सबस्टेशन उभारण्यात आले. पर्यटन वाढीच्या दृष्टीने मुंबई गोवा महामार्ग, चिपी विमानतळ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ही महत्त्वाची कामे मार्गी लावली जात आहेत. जे प्रलंबित रस्ते आहेत ते देखील मार्गी लावले जात आहेत.त्यामुळे पर्यटन वाढीसाठी ग्रा.प.ने देखील योजना आखाव्यात असे आवाहन खा. राऊत यांनी केले.

यावेळी आ. वैभव नाईक म्हणाले,माजी राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी चांदा ते बांदा हि चांगली योजना जिल्ह्यासाठी आणली. यामार्फत पर्यटकांना सुविधा देण्यासाठी निधी राखीव ठेवला. हा निधी भूमिगत वीज वाहिन्यासाठी वापरला जात आहे.तळाशील-तोंडवळी हे महारष्ट्रातील पाहिलं गाव आहे. ज्याठीकाणी वीज वाहिन्या भूमिगत केल्या जात आहेत.त्याचबरोबर या भागातील इतर विद्युत विषय समस्या सोडविल्या जाणार आहेत. धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचा प्रश्न आहे तो देखील येत्या वर्षभरात मार्गी लावला जाईल.कांदळवन प्रतिष्ठानच्या माध्यमातून समुद्री प्राण्यांना जखम झाल्यास त्यांच्या उपचारासाठी छोटे हॉस्पिटल देखील तळाशील-तोंडवळी येथे उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी आमदार वैभव नाईक यांनी दिली.

यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, विद्युत वितरणचे कार्यकारी अभियंता श्री मोहिते, माजी जी प. सदस्य संग्राम प्रभुगावकर,विभाग प्रमुख उदय दुखंडे, पंचायत समिती सदस्य निधी मुणगेकर, उपविभागप्रमुख भाऊ परब, तोंडवळी सरपंच आबा कांदळकर, उपसरपंच दशरथ वायंगणकर, समीर हडकर, नितीन घाडी,मंगेश गावकर, संजय केळुसकर, गणेश तोंडवळकर, प्रमोद पाटील,आचरा डिव्हिजनचे उप विभागीय अभियंता श्री. मुगडे, पतन अभियंता श्री बोथीकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page