नवी दिल्ली /-

पूर्व लडाखमध्ये भारत व चीन यांच्यात सीमेवरील तणाव वाढला असतानाच, अंबाला हवाई तळावर आज (गुरुवारी) राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीचा भारतीय हवाई दलात औपचारिकरीत्या समावेश होणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, त्यांचे फ्रान्समधील समपदस्थ फ्लोरेन्स पार्ली, संरक्षण दले प्रमुख जनरल बिपिन रावत, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया व संरक्षण सचिव अजय कुमार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील. ‘राफेल’च्या समावेशाबरोबरच, पारंपरिक सर्वधर्म पूजा, राफेल आणि तेजस विमानांसह ‘सारंग हवाई कसरत चमूचे’ हवाई प्रदर्शन यांचा कार्यक्रमात समावेश असेल.
हा कार्यक्रम हवाई दलाच्या इतिहासातील ‘अतिशय महत्त्वाचा मैलाचा दगड’ ठरेल, असे हवाई दलाचे प्रवक्ते म्हणाले.राफेल विमानांचा हवाई दलाच्या १७ व्या स्क्वाड्रनमध्ये समारंभपूर्वक समावेश होण्यापूर्वी राफेलच्या ताफ्याला पाण्याच्या तोफांची (वॉटर कॅनन) पारंपारिक सलामी दिली जाणार आहे.या समारंभात सहभागी होणाऱ्या फ्रेंच शिष्टमंडळात फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लेनाइन, फ्रान्सच्या वायुसेनेचे उपप्रमुख एअर जनरल एरिक ऑटेलेट, दसॉल्त अ‍ॅव्हिएशनचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रॅपियर आणि क्षेपणास्त्र उत्पादक कंपनी एमबीडीएचे सीईओ एरिक बेरांजर यांचा समावेश असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page