प्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे-करजगी यांची श्रद्धांजली सभा आज पार पडली.

चंद्रपूर: प्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे-करजगी यांची श्रद्धांजली सभा आज पार पडली. मात्र शीतल आमटे यांच्या शोकसभेला आमटे कुटुंबीय उपस्थित न राहिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे आमटे आणि करजगी कुटुंबातील कलहाबाबतच्या चर्चेला तोंड फुटले आहे.
आज सकाळी आनंद वन येथे शीतल आमटे-करजगी यांच्या समाधीस्थळी श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या श्रद्धांजली सभेला आमटे कुटुंबातील सर्व जण उपस्थित राहतील असं बोललं जात होतं. पण आमटे कुटुंबीयांनी या श्रद्धांजली सभेकडे पाठ फिरवल्याने आमटे-करजगी कुटुंबातील वाद पुन्हा एकदा दिसून आला आहे. या श्रद्धांजली सभेला आनंदवनशी निगडीत अनेकांनी प्रत्यक्ष आणि काहींनी झूम अॅपद्वारे हजेरी लावून शीतल आमटे यांच्या कार्याला उजळणी दिली. तसेच शीतल आमटे यांच्याबाबतच्या स्मृतींना उजळा दिला.

डॉ.शीतल आमटे यांच्या मृत्यू नंतर त्यांचे सासू-सासरे म्हणजे शिरीष आणि सुहासिनी करजगी यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून आमटे परिवारावर अनेक गंभीर आरोप केले होते. या पोस्टमुळे डॉ.शीतल आमटे यांच्या मृत्यूबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र श्रद्धांजली सभेला कुटुंबीय हजेरी लावतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु, आमटे कुटुंबीयांच्या अनुपस्थितीमुळे दोन्ही कुटुंबीयातील वाद अजूनही कायम असल्याचेच पुन्हा एकदा दिसून आले आहे. यावेळी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टबाबत आणि आमटे कुटुंबीयांच्या गैरहजेरी बाबत करजगी परिवाराने काहीही बोलण्यास नकार दिला आहे. मात्र, शीतल यांच्या रुपाने आनंदवनशी संबंध जोडल्या गेल्याची भावूक प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली.

आनंदवनातील राहत्या घरात आत्महत्या

शीतल आमटे-करजगी यांनी 30 नोव्हेंबर रोजी आनंदवन येथील त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली. शीतल यांनी आनंदवन येथील राहत्या घरी विषाचे इंजेक्शन घेतलं होतं. त्यानंतर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. पण त्यापूर्वीच शीतल यांची प्राणज्योत मालवली. शीतल आमटे आनंदवनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या. मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला.

कोण आहेत डॉ. शीतल आमटे?

शीतल आमटे या शिक्षणाने डॉक्टर होत्या. त्या अपंगत्व विशेषज्ज्ञ म्हणूनही प्रसिद्ध होत्या. त्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांच्या नात होत्या. डॉ. विकास आमटे आणि डॉ. भारती आमटे त्यांचे आई-वडील आहेत. बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या सेवाकार्याने वेगळी ओळख निर्माण केलेल्या महारोगी सेवा समितीच्या त्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या.

भारतातील वैद्यकीय क्षेत्रातील तरुणांना सामाजिक क्षेत्रात कामाला प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. शीतल आमटे यांनी मशाल आणि चिराग या कार्यक्रमांची उभारणी केली होती. त्याच्या त्या संस्थापक होत्या. त्यांनी नुकतंच निजबल नावाचं एक सेंटरही सुरु केलं होतं. याअंतर्गत शारीरिक अपंगत्व आलेल्या नागरिकांना स्वावलंबी करण्यासाठी आणि त्यांना विविध कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध करुन देण्यासाठी काम केलं जात होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page