महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये देशभरात सातत्याने वाढ होत असल्याचं आकडेवारीवरून सहज दिसून येतं. त्यामुळे त्यासंदर्भात कठोर कायदे करण्यात यावेत, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतीच यासंदर्भातल्या ‘शक्ती कायद्या’ला मंजुरी दिली असून बलात्कार प्रकरणातील गुन्हेगाराला लवकरात लवकर शिक्षा होण्यासाठी या कायद्याने मदत मिळू शकणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर छत्तीसगड राज्याच्या महिला आयोग अध्यक्ष किरणमयी नायक यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. महिलांची सध्याची परिस्थिती आणि खोट्या आमिषांना बळी पडण्याची वृत्ती यावर नायक यांनी बोट ठेवलं असताना त्यांच्या वेगळ्याच वक्तव्यावरून वाद निर्माण केला जात असल्याचं बोललं जात आहे.

नेमकं काय म्हणाल्या नायक?
महिलांविरोधातील गुन्ह्यांसंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना नायक यांनी वरील विधान केलं आहे. त्या म्हणाल्या, ‘बहुतांश प्रकरणांमध्ये ब्रेकअप झाल्यानंतरच मुली बलात्काराची तक्रार करण्यासाठी पोलिसांकडे जातात’. नायक यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला असून त्यांच्या विधानावर टीका केली जात आहे. मात्र, याच पत्रकार परिषदेत त्यांनी मांडलेल्या इतर मुद्द्यांवरून त्यांची नेमकी भूमिका अधिक स्पष्ट होत आहे.

मुलींनी काळजी घेणं गरजेचं!
नायक पुढे म्हणाल्या, ‘जर एखाज्या विवाहित पुरुषाने एखाद्या मुलीला किंवा महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला, तर त्या मुलीने काळजी घेणं गरजेचं आहे. त्यांनी विचार करायला हवा की ही व्यक्ती खरं बोलत आहे किंवा नाही. जेव्हा त्यांचं नातं टिकू शकत नाही, तेव्हा ते पोलिसांकडे जातात. बऱ्याच प्रकरणांमध्ये मुलींच्या संमतीनेच शारिरीक संबंध किंवा लिव्ह-इन संबंध ठेवले जातात. पण ते विभक्त झाल्यानंतर बलात्काराचे गुन्हे दाखल होतात.’

यासोबतच नायक यांनी अशा प्रलोभनांना बळी पडणाऱ्या मुलींना आवाहन देखील केलं आहे. त्या म्हणाल्या, ‘मी अशा महिलांना आवाहन करते, की त्यांनी अशा आमिषांना बळी पडू नये. जर अल्पवयीन मुली असतील, तर त्यांनी अशा फिल्मी रोमान्सच्या जाळ्यात अडकू नये. अशानं तुमचं कुटुंब, मित्रपरिवार आणि तुमचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. हल्ली १८व्या वर्षीच विवाह करण्याचा नाव ट्रेंड सुरू झाला आहे. यामुळे मुलं झाल्यानंतर काही वर्षांनी पती-पत्नी अशा दोघांनाही नातं टिकवण्यात अडचणी निर्माण होतात’, असं देखील नायक यांनी यावेळी नमूद केलं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page