ठाण्यातील कापूरबावडी सर्कल येथे पोलिसांनी कारवाई करत तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ८५ लाखांहून अधिक मूल्याच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे: ठाण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. ८५ लाख ४८ हजार रुपये मूल्याच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या वागळे इस्टेट युनिटने ही कारवाई केली आहे.सचिन आगरे, मन्सूर खान आणि चंद्रकांत माने अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी काही जण बनावट नोटा विक्रीसाठी कापुरबावडी सर्कलला येणार असल्याची माहिती खबऱ्यांकडून पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला. त्यांनी सचिन आगरे (वय २९) याला अटक केली. त्याच्याकडून ८५ लाख ४८ हजार रुपये मूल्याच्या बनावट नोटा जप्त केल्या, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आगरे याच्या चौकशीतून आणखी दोन आरोपींची नावे समोर आली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करून मन्सूर खान आणि माने याला अटक केली. आगरे आणि खान हे दोघे रत्नागिरीतील चिपळूणचे आहेत, तर, माने हा मुंबईतील रहिवासी आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. कापूरबावडी पोलीस ठाण्यात या तिघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी बनावट नोटा छापण्यासाठी वापरण्यात आलेले संगणक, प्रिंटरसह इतर उपकरणे जप्त केली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page