पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस काही आठवड्यात येणार असल्याचं स्पष्ट केल्याने दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस काही आठवड्यात येणार असल्याचं स्पष्ट केल्याने दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. दिल्ली सरकारने आजपासून कोरोना लस टोचण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी सुरू केली आहे. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील एक कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्याचं उद्दिष्टं दिल्ली सरकारने ठेवलं आहे. त्यानंतर कोरोनाच्या लढाईत उतरलेल्या ईतर दोन कोटी कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे.

दिल्ली सरकारने लस टोचण्यासाठी दिल्लीतील विविध रुग्णालये, नर्सिंग होममधील आरोग्य कर्मचाऱ्यांची आजपासून नोंदणी सुरू केली आहे. तसेच कोरोना लसची साठवणूक करण्याची तयारीही दिल्ली सरकारने केली आहे. दिवाळीनंतर दिल्लीत कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झाला होता. त्यामुळे दिल्ली सरकारने कोरोनाचा संसर्ग फैलावू नये म्हणून कंबर कसली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी लसीकरणाची सविस्तर माहिती दिली. कोविड-19ची लस सर्वात आधी डॉक्टर, नर्ससहित एक कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाईल. त्यानंतर पोलीस, सशस्त्र दलाचे जवान, पालिका कर्मचाऱ्यांसोबत फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या दोन कोटी लोकांना लस टोचली जाणार असल्याची माहिती भूषण यांनी पंतप्रधानांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.

फोन, व्हॉट्सअ‍ॅप सुरू ठेवा, अधिकाऱ्यांना आदेश
दिल्ली सरकारने घरून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांचा फोन आणि व्हॉट्सअ‍ॅप सुरू ठेवण्याचे आदेश दिला आहेत. तसेच कोणत्याही परवानगी शिवाय शहराबाहेर जाण्यास या अधिकाऱ्यांना मज्जाव करमअयात आला आहे. अति महत्त्वाच्या सेवेत नसलेल्या 50 टक्के कर्मचाऱ्यांना दिल्ली सरकारने घरून काम करण्याची परवानगी दिली आहे. महिला आणि बालविकास मंत्रालय आणि सामाजिक न्याय विभागानेही आदेश जारी करून घरून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांचे फोन, व्हॉट्सअ‍ॅप आणि ईमेल सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. घरून काम करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला गरज पडल्यास ऑफिसात बोलावले जाईल, असंही या आदेशात म्हटलं आहे. त्याशिवाय 31 डिसेंबरपर्यंत आपआपल्या खात्याच्या पूर्व परवानगीशिवाय शहराच्या बाहेर जाऊ नका, असंही या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

मोदी काय म्हणाले?
येत्या काही आठवड्यात कोरोनाची लस उपलब्ध होणार असून संशोधकांचा हिरवा कंदिल मिळताच लसीकरणास सुरुवात होणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जाहीर केलं होतं. सर्वपक्षीय बैठकीला संबोधित करताना त्यांनी ही माहिती दिली होती. या विषयावर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चाही झाल्याचं मोदींनी म्हटलं आहे. लसीकरणाच्या मुद्द्यावरून अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी अनेक सल्ले दिले. काही दिवसांपूर्वी लस निर्मिती करणाऱ्या संशोधकांशीही माझं बोलणं झालं होतं. त्यांनीही कोरोनाची लस लवकरच तयार होणार असल्याचं म्हटलं आहे, असंही त्यांनी सांगितल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page