ठाणे /-

मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील शाळाही ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना या संदर्भातले निर्देश दिले आहेत. त्यामुळे ठाणे जिल्हा, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली या ठिकाणी असलेल्या शाळा ३१ तारखेपर्यंत बंदच राहणार आहेत. ठाणे जिल्ह्याची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. संपूर्ण जिल्ह्याच्या अंतर्गत येणाऱ्या शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. २३ नोव्हेंबरपासून राज्यांमधल्या शाळा उघडल्या जाव्यात असे आदेश राज्य सरकारने दिले. मात्र त्याचवेळी शाळा उघडण्याचा निर्णय त्या त्या जिल्ह्याच्या स्थानिक प्रशासनांनी घ्यावा असंही म्हटलं आहे. आजच ३१ डिसेंबरर्यंत मुंबईतील शाळा उघडणार नसल्याचा निर्णय झाला. त्यापाठोपाठ आता ठाणे जिल्ह्यातील शाळाही ३१ डिसेंबरपर्यंत उघडणार नाहीत हे स्पष्ट झालं आहे.

मागील काही दिवसांपासून मुंबईत करोनाचा प्रसार पुन्हा वाढू लागला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून बृह्नमुंबई महापालिकेनं आपल्या हद्दीतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी यासंदर्भातील आदेश काढला आहे. त्यामुळे आता मुंबईतील शाळा नव्या वर्षातच उघडणार आहे.

राज्यात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. तर दुसरीकडे मुंबईसह राज्यातील करोनाचं सावट अजूनही कमी झालेलं नाही. जनजीवन पूर्वपदावर येत असून, रस्त्यांवर गर्दीही वाढताना दिसत आहे. त्यामुळे करोना प्रसाराचा धोका वाढला असून, दिवसागणिक रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. मुंबईतही करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बृह्नमुंबई महापालिकेनं आपल्या हद्दीतील शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापाठोपाठ आता ठाणे जिल्ह्यातील शाळाही ३१ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page