राष्ट्रवादीची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार, चौकशी करून करणार कारवाई, पोलीस अधीक्षकांचे आश्वासन

कणकवली /-

नवीन कुर्ली गावात नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यक्रमात जाऊन येथील वादाला खतपाणी मिळून सामाजिक तेढ निर्माण होईल असे भाषण करणे कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी याना महागात पडले आहे. आज राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे तक्रार केली आहे. यावेळी दाभाडे यांनी चौकशी करून कारवाई करणार असल्याचे आश्वासन या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे कोळी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे कणकवली तालुकाध्यक्ष राजू पावसकर यांचे निवेदन राष्ट्रवादीचे जेष्ठ कार्यकर्ते सुंदर पारकर, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, जिल्हा कृषी सेल अध्यक्ष समीर आचरेकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे, कि कुर्ली नवीन वसाहत गावात स्थानिक प्रश्नांवरून समाजांतर्गत वाद आहेत. अलीकडेच या वादाने गावातील दोन गटात हातघाईचा प्रसंग निर्माण झाला होता. हा वाद सध्या न्यायप्रविष्ठ आहे. असे असताना २५ ऑक्टोबर २०२० रोजी कणकवलीचे पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांचा नवीन कुर्ली गावातील एका गटाकडून साजरा करण्यात येणाऱ्या “नवदुर्गा युवा मंडळ” या नवरात्रोस्तव मंडळाने कोविड योद्धा म्हणून सन्मान केला. यावेळी भाषण करताना शिवाजी कोळी यांनी याठिकाणी गावातील वादाला आणखीन खतपाणी मिळेल व एका गटाला प्रोत्साहन मिळेल अशा प्रकारे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले “मध्यंतरीच्या कालावधीमध्ये नवीन कुर्ली गावामध्ये काहींनी वातावरण दूषित करण्याचं काम केलं पण त्यांनाही कायद्याच्या चौकटीत राहून धडा शिकवला आहे.” त्यांचं हे वक्तव्य मीडियामध्येही आलेलं आहे.

वस्तुतः तालुक्याच्या पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असताना शिवाजी कोळी यांनी सामाजिक सलोखा राखण्याची गरज आहे. कोळी यांच्या या वक्तव्यावरून येथील एका गटावर पोलिसांनी केलेली कारवाई किंबहुना गावातील या वादामध्ये पोलिसांची एकंदरीत भूमिका संशय निर्माण करणारी आहे. तर एका गटावर केलेली कारवाई आकसाने केल्याचे प्रतीत करणारी आहे. याव्यतिरिक्त पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्याबाबतीत आपल्या खात्याकडे अनेक तक्रारी आहेत. जुगार, दारू व्यवसायावरची त्यांची कारवाई नेहमीच संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तालुक्यातील त्यांच्या अनधिकृत धंद्यांविरोधातील कारवाईबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. तरी याबाबत आपल्या स्थरावरून संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई व्हावी. तसेच पोलीस दलाच्या बाबत सामान्य माणसामध्ये असलेली आदरयुक्त भीतीची, सन्मानाची भावना आणखीन वृद्धिंगत करावी.

दरम्यान पोलीस अधीक्षकांनी कारवाईचे आस्वासन दिले असून याबाबत आपण लवकरच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची मुंबई येथे भेट घेणार असल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान नवीन कुर्ली मधील वादात कणकवली पोलिसांनी केलेली कारवाई ही आकसाने केली असल्याचे पोलीस निरीक्षक कोळी यांच्या भाषणातून दिसून आले आहे याकडे आम्ही आज जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे लक्ष वेधले आहे तसेच कणकवली मध्ये अवैध धंद्यातील कोळी यांची कारवाईही संशयाच्या भोवऱ्यात आधीच सापडली आहे. त्यामुळे कुर्ली गावातील एका गटालाही ते पाठीशी घालत असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी भूमिका आमची आहे. योग्य कारवाई न झाल्यास राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून शिवाजी कोळी यांच्या विरोधाचे आंदोलन करतील असा इशाराही या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. तसेच याबाबत गृहमंत्री यांनाही काळविन्याय आल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page