राज्यकर्त्यांचे शेतीच्या बांधावरील पाहणी दौरे आटोपले असतील तर नुकसान भरपाई नेमकी किती देणार आहेत हे जाहीर करावे…की गतवर्षी प्रमाणे गुंठ्याला 80 रुपये मदत देऊन शेतकऱ्यांची थट्टा करणार..मनसेचा सवाल..?

कुडाळ /-

“इडा पीडा टळू दे अन बळीचं राज्य येऊ दे” या आशेवरच बळीराजा आजपर्यंत जगण्यासाठी धडपडतोय अशी परिस्थिती आहे. अगदी टोकाचा संघर्ष करून देखील पदरात काहीच पडत तर नाही शिवाय शासनाकडून तुटपुंजी मदत जाहीर करून जणू थट्टाच केली जाते असे चित्र आहे. गतवर्षी अतिवृष्टीने झालेल्या शेतीच्या नुकसान भरपाईसाठी महाराष्ट्र शासनाने गुंठ्याला 80 रुपये मदत करून शेतकऱ्यांची चेष्टा केली होती. यावर्षी तर अवकाळी पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शासनाचे कर्मचारी प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करत आहेत परंतु महाराष्ट्र शासन नुकसान भरपाई नेमकी किती देणार आहे याबाबत राज्यकर्ते बोलायला तयार नाहीत.त्यामुळे आघाडी सरकारच्या शेतकऱ्यांबाबतच्या भूमिकेबद्दल साशंकता उपस्थित होत आहे. मागील वर्षीची तुटपुंजी मदत देखील अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहचली नाही याचा जाब शेतकऱ्यांनी राज्यसरकरच्या प्रतिनिधींनी विचारणे काळाची गरज आहे.

या शिवाय यावर्षी भात पिकाच्या सदोष बियाण्यांमुळे “काळा नेर” उगवल्याच्या तक्रारी प्राप्त आहेत.शेतकऱ्यांनी याबाबत कृषी सेवा केंद्र प्रतिनिधींना विचारणा केल्यावर थातूर मातूर उत्तरे देऊन जबाबदारी टाळण्याचे प्रकार घडलेले आहे. याबाबत कृषी विभागाने गांभीर्यपूर्वक लक्ष वेधून संबंधित बियाणे उत्पादक कंपन्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना अशाप्रकारे सदोष बियाण्यांचा अनुभव आल्यास मनसेशी संपर्क साधावा. मनसे आपल्या पूर्णपणे पाठीशी असून शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत सदरील प्रकरणांचा शासनस्तरावर पाठपुरावा करेल अशी ग्वाही मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page