शेतकरी विधेयकामुळे शेतकरी उद्ध्वस्त होऊन मोठे उद्योगपती व कार्पोरेट कंपन्याच्या हातात शेती क्षेत्र जाईल

मालवण /-

केंद्र सरकारकडून राज्यांवर लादण्यात येणारे शेतकरी विधेयक हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहे, असे भासविण्यात येत आहे. मात्र, कोरोनाच्या महामारीतही आणि संकटकाळात शेती आणि शेतकरी टिकून असल्याने मोठ्या कंपन्या व कॉर्पोरेट क्षेत्राचे लक्ष शेतीकडे वळलेले आहे. भविष्यात शेतकरी उद्धस्त होऊन मोठे उद्योगपती, कार्पोरेट कंपन्या यांच्या हातात शेती क्षेत्र जाईल. अशी भीती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांचा माल यापूर्वीही थेट बाजारात विकला जात होता. आताही विकला जात आहे. त्यामुळे फार मोठे असे काही या विधेयकातून साध्य झालेले नाही, बाजार समिती आणि दलाल यांच्याबद्दल शेतकऱ्यांच्या मनात राग आहे. मात्र यामुळे बाजार समित्या रद्द करून मोठ्या कंपन्यांच्या घशात शेतकऱ्याचा माल सोपविण्याचा निर्णय योग्य नाही. बाजार समित्यांतील त्रुटी दूर करून त्यांना सुधारण्याची संधी दिली पाहिजे म्हणूनच आमचा शेतकरी विधेयकाला विरोध आहे, असे शेट्टी म्हणाले.

कोकण दौऱयावर आलेल्या
राजू शेट्टी यांनी मालवण भेटी दरम्यान हॉटेल स्वामी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी शेती, आंबा बागायतदार, मच्छिमार या बाबत त्यांनी भाष्य केले.

खासगी कंपन्यांचे लक्ष भारतीय खाद्य निगमकडे आहे. या निगमच्या मालमत्ता आणि गोडाऊन या मोक्याच्या ठिकाणी आहेत. शेतकरी बाजार समित्यांचे काम थांबल्यानंतर भारतीय खाद्य निगम ताब्यात घेऊन त्यांची मालमत्ता स्वतःच्या फायद्यासाठी वापरण्यावर कंपन्यांचा डोळा आहे, त्यामुळे आतापासूनच आम्ही विरोधात उभे आहोत. राज्य सरकारला आम्हीच हे विधेयक महाराष्ट्रात लागू करू नये, असे सांगितल्याने त्यांनी तसा निर्णय घेतला आहे. केंद्र शासन जबरदस्तीचने महाराष्ट्रात हे विधेयक लागू करू शकत नाही, असेही शेट्टी म्हणाले.

रत्नागिरी येथील नाणार प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध असल्याने आम्ही शेतकऱ्यांबरोबरच राहणार आहोत. तर जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पाच्या बाजूने आणि विरोधात असे दोन वेगवेगळी मते असल्याने जर शेतकरी विरोधात असतील, तर आम्ही सदैव शेतकऱ्यांच्या सोबतच राहणार आहोत. सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन नेहमीच संघर्ष करत आलेलो आहे. त्यामुळे कोणतेही आंदोलन आणि संघर्षासाठी आम्ही सज्ज असतो, असे शेट्टी म्हणाले.

कर्नाटक, महाराष्ट्र आणि केरळ येथील मच्छीमारांना एकत्रित करून त्यांच्या समस्येबाबत लढा उभारण्यासाठी शेतकरी स्वाभिमानी संघटना प्रयत्नशील आहे. मच्छीमार आणि शेतकरी हे एकसमान असून शेतकरी शेतात राबून, तर मच्छीमार जीवावर उदार होऊन समुद्रात संघर्ष करत आहे. यामुळे नजीकच्या काळात मच्छीमारांच्या सर्व संघटनांना एकत्रित करून केंद्र अगर राज्य शासन यांच्याकडे आपल्या हक्कांसाठी लढा दिला जाईल, असेही शेट्टी म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत शेतकरी स्वाभिमानी संघटनेच्या पाठिंब्यावर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांचे संख्याबळ वाढलेले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस आम्हाला विधानपरिषदेची आमदारकी देत असेल, तर त्यात वेगळे काही नाही. ते दिलेला शब्द पाळत आहेत, असे असले, तरी आपण हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार. असा पुनरुच्चार राजू शेट्टी यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page