मुंबई /-

दिवसोंदिवस भारतामध्ये करोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. पहिल्या फळीतील लाखो करोनायोद्धे करोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी दिवस रात्र काम करत आहे. अनेक सरकारी अधिकारी आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी आऊट ऑफ द बॉक्स जाऊन करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये सहभागी झालेत. असेच एक प्रकरण उत्तर प्रदेशमधील गाजियाबादमधून समोर आलं आहे. येथील उपविभागीय दंडाधिकारी असणाऱ्या सौम्या पांडे यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर १५ व्या दिवशीच पुन्हा कार्यालयात हजेरी लावली आहे. करोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी २६ वर्षीय सौम्या यांनी आपल्या लहान बाळाला घेऊनच कार्यालयात उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या या निर्णयाचे सध्या सर्व स्तरांमधून कौतुक होताना दिसत आहे.

सध्या मोदीनगरच्या उपविभागीय दंडाधिकारी असणाऱ्या सौम्या या सात महिन्याच्या गर्भवती असतानाच जुलै महिन्यात त्यांना करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये गाझियाबादल जिल्ह्याच्या नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलं. जिल्ह्यामध्ये दिवसाला १०० हून अधिक करोनाबाधित रुग्ण आढळून येत होते त्यावेळी नियमांनुसार सौम्या यांना मॅटर्निटी लीव्ह म्हणजेच गरोदर महिलांना देण्यात येणारी विशेष सुट्टी घेण्याची मूभा होती. मात्र त्यांनी सुट्टी घेण्याऐवजी आपल्या क्षेत्रामध्ये करोनावर नियंत्रण मिळवण्यासंदर्भातील महत्वाचे दौरे सुरुच ठेवले. अनेक ठिकाणी सौम्या यांनी स्वत: जाऊन आरोग्य व्यवस्थांची पहाणी केली. १७ सप्टेंबर रोजी सौम्या यांनी मेरठमधील एका रुग्णालयामध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर अवघ्या १४ दिवसांनंतर त्या आपल्या लहान मुलीला घेऊन कार्यालयामध्ये कामाला रुजू झाल्या.

“डॉक्टर, नर्स आणि अनेक लोकं करोनाच्या कालावधीमध्ये अथक कष्ट करत आहेत. अशा वेळेस मी स्वत:च्या कर्तव्यापासून दूर राहणं चुकीचं आहे. मी केवळ २२ दिवसांची सुट्टी घेतली होती. बाळाला जन्म दिल्यानंतर दोन आठवड्यांनी मी कामावर रुजू झाले आहे,” असं सौम्या यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page