सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘कोरोना’ चे वाढते प्रमाण लक्षात घेता जिल्हा परिषद प्रशासन इतके असंवेदनशील कसे असा थेट सवाल जि. प.च्या आरोग्य समितीच्या माजी सभापती डॉ. अनीषा दळवी यांनी एका जाहीर निवेदनाद्वारे विचारला आहे.एवढे करून त्या थांबलेल्या नाहीत.या सगळ्याला त्यांनी प्रशासनाचे प्रमुख या नात्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यानाच संपूर्णतः जबाबदार धरले असून असा अधिकारी जिह्यात राहू नये, त्यांना त्वरीत बदलण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.
पेशाने डॉक्टर असलेल्या श्रीमती दळवी या दोडामार्ग तालुक्यातील भेडशीच्या.जिल्ह्यातील एक ज्येष्ठ राजकीय नेते सुरेश दळवी यांच्या त्या स्नुषा.जि. प.वर सत्तेत असलेल्या भाजपाच्या त्या क्रियाशील सदस्या. साहजिकच त्यांच्या या निवेदनाने जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
बरं, त्यांनी प्रशासनावर नुसताच आरोप केलेला नाही तर कोरोनाच्या संकटाला कसं सामोरं जायचं,कोणत्या उपाययोजना कराव्यात याचा तपशील त्यांनी दिला आहे.अलिकडच्या काही दिवसात शहरी भागात पसरलेला कोरोना आता ग्रामीण भागात कसा झपाट्याने पसरत चालला आहे,मृत्युच्या दरात कशी वाढ होते आहे,याचे विवेचन करताना त्याला रोखण्यासाठी कोणकोणत्या उपययोजना कराव्यात याचा तपशीलही त्यांनी दिला आहे.तसेच जि. प. प्रशासनाच्या नियोजनशुन्यतेमुळे प्रशासन अपयशी ठरलं आहे असा गंभीर आरोपही त्यांनी आपल्या निवेदनात केला आहे.
जि. प.ची आरोग्य केंद्रे,उप-केंद्रे,सुसज्ज करून ती अधिक क्षमतेने कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तिथली कर्मचारी संख्या वाढवावी,आरोग्य विभाग,हिवताप विभाग आदी विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करावा, एनएचएम अंतर्गत कन्त्राटी पद्धतीने सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांची तातडीने भरती करावी,आदी सूचनाही त्यांनी आपल्या निवेदनात केल्या आहेत.
खरं तर ‘कोरोना’ चं संकट आल्यापासून जि.प.प्रशासन आणि जि. प.च्या आरोग्य विभागाने कशा प्रकारे आपली भूमिका पार पाडली,कोणती पाऊले उचलली हा आता वादाचा, चर्चेचा विषय बनलेला आहे. पदाधिकारी,जि. प.,आणि पंचायत समिती सदस्य तसंच आम जनतेच्या माहितीसाठी प्रशासनाने हे जाहीर करण्याची गरज आहे.
गेल्या काही महिन्यात ज्या सभा-बैठका झाल्या त्यात ही माहिती प्रशासनाने स्वतःहून द्यायला हवी होती.सदस्यानांही ती जाणून घेण्याची गरज कदाचित वाटली नसावी,किवा याकडे त्यांनी दुर्लक्ष केले असेच म्हणावे लागेल.’कोरोना’ या एकाच विषयावर जि.प.ची खास सर्वसाधारण सभा बोलवायला हावी होती.शिवाय पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याची आणि त्यांच्यातील नाराजीची चर्चा होतीच.जि. प.मधील सत्तारूढ़ सदस्य आणि विरोधी पक्षांचे सदस्य यांनी या विषयाकडे पाहिजे तेवढया गांभीर्याने पाहिले नाही,त्यात लक्ष घातले नाही म्हणूनच आज जिल्ह्याची ही वाईट अवस्था झालेली दिसते आहे.आणि हेच दारूण चित्र डॉ.अनिषा दळवी यांनी समोर आणले आहे.
या संकटावर मात करण्याची जबाबदारी ही आपली नसून जिल्हाधिकारी,जिल्हा प्रशासन आणि जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अखत्यारीतील जिल्हा रुंग्णालयाची आणि सरकारी आरोग्य यंत्रणेची आहे असा समज जि. प.प्रशासनाने करून घेतला असेल तर ते अक्षम्य आहे.जिल्ह्यातील दूरच्या गावात एखादा सर्दी- खोकला किंवा तापाचा रूंग्ण आरोग्य केंद्रात-उप-केंद्रात आला की १०८ ला फोन करायचा आणि त्याची रवानगी थेट जिल्हा रुंग्णालयात करायची म्हणजे आपले काम संपले असेच गेले काही महिने,आणिआजही सुरु आहे अशा सर्वसामान्य जनतेच्याच तक्रारी आहेत.यामुळेच जिल्हा रुंग्णालायावर ताण पडत गेला आणि एक ना अनेक समस्या उदभवत गेल्या.
एकूणच जिल्हा रुंग्णालय आणि जि. प.आरोग्य विभागातील समन्वयाचा अभाव,जि. प.आरोग्य विभागाची ,प्रशासनाची नियोजन शुन्यता,पदाधिकरी ,सदस्य यांचे दुर्लक्ष, प्रशासनानेसुद्धा त्यांना विश्वासात न घेतल्यामुळे आज ‘कोरोना ‘चा फैलाव पार खेडयापाड्यापर्यंत होत गेला ही वस्तूस्थिती नाकारता येणार नाही.
राज्यात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग.जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ८ लाख ५० हजार.त्यात शहरी लोकसंख्या अवघी १२.६ टक्के,उर्वरीत सर्व ग्रामीण लोकसंख्या.यावरून जि.प.च्या आरोग्य विभागाची ,प्रशासनाची जबाबदारी सर्वाधिक हे ओघाने आलेच. असे असूनही ही जबाबदारी जि. प. प्रशासनाकडून आतापर्यंत नीटपणाने पार पाडली गेली का हा खरा सवाल आहे.याचे उत्तर आता प्रशासनाने द्यायचे आहे.
परवा जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारानीही हाच प्रश्न विचारला मात्र त्याला जि.प.प्रशासनाचे प्रमुख असलेले ‘सीईओ ‘ आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी उत्तर देण्याचे टाळले आणि वेळ मारून नेली.
गेल्या काही वर्षात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने स्वछता,प्रशासन सुधारणा आदी क्षेत्रात राज्यात उत्तम काम केले आहे.राज्य,तथा देश पातळीवरअनेक परितोषिके मिळविली.याच जि. प.ने यशस्वी केलेल्या काही योजनांचे अनुकरण अन्य जिल्ह्यानी केले आहे हे सर्वश्रुत आहे.अभिमान वाटावा अशीच ही बाब आहे.तर मग ‘कोरोना’वर मात करण्यासाठी अन्य जिल्ह्यानी जर चांगले काम केले असेल तर त्याचे अनुकरण आपण करायला काय हरकत आहे.आपल्या शेजारचा कोल्हापूर जिल्हा घ्या .जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ३८ लाख तरीही तिथल्या आरोग्य विभागाने , जि. प.प्रशासनाने तात्काळ पाऊले उचलून सर्वसंबंधित विभागातील कर्मचाऱ्याना सोबत घेत नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करत ‘कोरोना ‘चा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात फैलाव होण्यापासून रोखण्यात यश मिळविले आहे हे विशेष होय.
यापूर्वी सिंधुदुर्गात जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून काम केलेले डॉ योगेश साळे हे कोल्हापूर जि.प.मध्ये आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.’माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ हा राज्य शासनाचा कार्यक्रम राबवायला आम्ही परवा पासून सुरुवात केली.मात्र कोल्हापुरात हेच काम आता अंतिम टप्प्यात आहे असे सांगण्यात आले.याचे मुख्य कारण म्हणजे शासनाचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी हा उपक्रम सुरु केला.कॉम्प्युटरच्या एका ‘क्लिक’ वर आज सर्व प्रकारची माहिती उपलब्ध आहे.आरोग्य विभागात हंगामी कर्मचारी भरतीचे अधिकार तालुका पातळीवर त्या त्या तहसिलदारांना देण्यात आले.आहेत.तिथली भरतीची प्रक्रिया सुद्धा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती डॉ. साळे यांनी दिली.
आज कोल्हापूर जि. प.ची ‘वेब साईट’ उघडली की त्यात कोवीड-१९ च्या संदर्भात सर्व माहिती उपलब्ध आहे.तर सिंधुदुर्ग जि. प.च्या ‘ वेबसाइट’ चा पुरता बोजवारा उडाला आहे.’माझे कुटुंब -माझी जबाबदारी ‘या कार्यक्रमाचा शुभारंभ तिथल्या सर्वसंबंधित अधिकाऱ्यांनी गावो- गावी भेटी देत केला.त्याची माहिती व फोटो त्याच दिवशी ‘वेबसाईट ‘वर बघायला मिळाले.तर इकडे आम्ही दशावतार कलावंतांच्या वतीने पथ नाट्याचा कार्यक्रम केला, आणि तोही जि. प.च्या प्रवेशदारात.याला उपस्थिती कोणाची तर जि. प.चे पदाधिकारी,सदस्य,अधिकारी आणि कर्मचारी.या सर्वाना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्याची खरच गरज होती काय..? हाच कार्यक्रम गावा-गावात एकाचवेळी झाला असता तर तो निश्चितच उपयुक्त,परिणामकारक ठरला असता.केवळ सोपस्कार म्हणून तो करण्यात काहीच अर्थ नाही.
तेव्हा अजूनही वेळ गेलेली नाही.जि. प. प्रशासनाने जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली,जि. प.चे पदाधिकारी,सदस्य,सरपंच,सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी आणि आम जनता या सर्वांना विश्वासात घेऊन एक ‘कृती कार्यक्रम’ तयार करावा आणि सर्व यंत्रणा अधिक जोमाने कामाला लावाव्यात.आजपासून,आतापासूनच याची सुरुवात केली तर या संकटावर मात करणे सोपे आणि शक्य होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page