नवी दिल्ली /-

कोरोनानं जगभरात हाहाकार माजवलेला असून, अनेक देश त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे या कोरोनाच्या संक्रमणातही नवाच आजार हळूहळू डोकं वर काढत आहे. वायव्य चीनमध्ये या विषाणूच्या संक्रमणानं अनेकांना ग्रासलेलं आहे. गांसु प्रांताची राजधानी असलेल्या लान्झहूच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (एनएचसी) अलीकडेच याची विषाणूची खातरजमा केली आहे. 3,245 लोकांना हा आजार झाला आहे आणि इतर1,401 जणांमध्ये या विषाणूची प्राथमिक लक्षणं आढळली आहेत. सुदैवाने अद्यापपर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. हा रोग भारतातही हातपाय पसरायला लागल्याची माहिती समोर आली आहे. मनुष्य आणि प्राण्यांवर त्याचा परिणाम होऊ लागला आहे.कोरोना व्हायरसपेक्षाही भयंकर आजारात याचा बदल होण्याची भीती वैज्ञानिकांना सतावते आहे.

ब्रुसेलोसिस हा ब्रुसेला या जातीतील जीवाणूंच्या गटामुळे होतो, जो प्राणी आणि मानवांवर परिणाम करू शकतो. हा सामान्यत: एखाद्या संक्रमित प्राण्याच्या द्रवपदार्थाशी थेट संपर्क साधून कच्चा किंवा डेअरी उत्पादनांच्या माध्यमातून किंवा दूषित हवेतून लोकांमध्ये पसरतो. सीडीसीच्या मते, मानवातील संसर्ग बहुतेक दूषित अन्न खाण्यामुळे पसरतो, जे लान्झोमध्ये दिसते आहे. परंतु हा जीवाणू लैंगिक संपर्काद्वारे आणि स्तनपान देणा-या मातांपासून ते त्यांच्या बाळांपर्यंत देखील पसरतो. आपल्या त्वचेवरील छोटीशी जखमदेखील आपल्याला संसर्ग होण्यास भाग पाडू शकते.

गेल्या वर्षी जुलैच्या शेवटी आणि ऑगस्टच्या सुरुवातीला झालेल्या झोंगमु लान्झो जैविक औषध निर्माण कारखान्यात गळतीमुळे ब्रुसेलोसिसचा प्रादुर्भाव झाल्याचे समजते. प्राण्यांच्या वापरासाठी ब्रुसेला लस तयार करताना कारखान्याने कालबाह्य झालेले जंतुनाशक आणि सेनिटायझर्स वापरल्याचा आरोप आहे. यामुळे कचरा वायूमध्ये मिसळून काही बॅक्टेरिया गळती झाल्याचे सीएनएनच्या अहवालात म्हटले आहे. ताप, सांधेदुखी, थकवा, भूक न लागणे, डोकेदुखी, घाम येणे ही ब्रुसेलोसिसची काही सामान्य लक्षणे आहेत. लक्षणे दिसण्यासाठी रोगाचा संसर्ग झाल्यानंतर काही दिवस ते काही महिने लागू शकतात.बहुतेक लक्षणे कोरोना आणि फ्लूसारखीच असतात.

ब्रुसेलोसिसदेखील संधिवात, स्पॉन्डिलायटीस (पाठीचा कणा सूज) यांसारख्या दीर्घकालीन लक्षणे देखील देऊ शकतो. कोरोनावर अद्याप कोणताही उपचार आढळला नाही, तर ब्रुसेलोसिसच्या उपचारांसाठी अनेक प्रतिजैविक उपलब्ध आहेत. या दोन आजारांमधील आणखी एक समानता म्हणजे ब्रुसेलोसिससाठी कोणतीही प्रभावी लस उपलब्ध नाही, तसेच कोरोनामध्ये देखील आहे. ब्रुसेलोसिसचा प्रतिजैविकांच्या माध्यमातून उपचार केला जाऊ शकतो. उपचारासाठी अनेक आठवडे ते महिने लागतात. तज्ज्ञांच्या मते, कच्चे दुग्धजन्य पदार्थ टाळणे आणि प्राण्यांबरोबर काम करताना खबरदारी घेणे हा सुरक्षित राहण्याचा उत्तम मार्ग आहे. ब्रुसेलोसिस डुकर, गायी, म्हशींसह शेतातील प्राण्यांमधून मनुष्यामध्ये संक्रमित होत असल्याचे मानले जाते. संशोधकांच्या मते, हा आजार भारतात आधीच अस्तित्वात आहे. भारतात ब्रुसेलोसिसची दरवर्षी अंदाजे 1 लाख प्रकरणे समोर येत असून, मृत्यूचे प्रमाण 2 टक्के आहे, असे एका संशोधन अहवालात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page