सिंधुदुर्ग /-

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या नियमित गाडय़ांतील आरक्षण क्षमता संपली असून २६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट दरम्यान अनेक गाडय़ांच्या विविध श्रेणीतील सर्व आसने आरक्षित झाल्याने आता गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणाऱ्या प्रवाशांना सोडण्यात येणाऱ्या ज्यादा गाड्यांवर भिस्त असणार आहे.

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या नियमित गाडय़ांतील आरक्षण क्षमता संपली असून २६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट दरम्यान अनेक गाडय़ांच्या विविध श्रेणीतील सर्व आसने आरक्षित झाल्याचे दिसत आहे. कोकणात जाणाऱ्या गाडय़ांच्या आरक्षणाचा प्रयत्न करताच प्रतीक्षा यादी अधिक झाल्याने रेल्वेने आरक्षण देणेच बंद केले आहे. काही गाडय़ांना मोठय़ा प्रमाणात प्रतीक्षा यादी असल्यामुळे यंदा मध्य रेल्वे, कोकण आणि पश्चिम रेल्वेला मोठय़ा प्रमाणात जादा गाडय़ा सोडाव्या लागतील. तर एसटी महामंडळालाही तसे नियोजन करावे लागणार आहे. दरवर्षी गणेशोत्सवासाठी मुंबईसह अन्य भागातून तीन ते चार दिवस आधीच कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. कुटुंबियांसह जाताना प्रवास सुकर व्हावा, यासाठी नियमित मेल, एक्स्प्रेस गाडय़ांचे आरक्षण प्रवासी चार महिने आधीच करतात.

३१ ऑगस्ट २०२२ ला गणेश चतुर्थी आहे. ऑगस्टच्या अखेरीस येणाऱ्या गणेशोत्सवासाठी चार महिने आधीच आरक्षण उपलब्ध करून देण्यात आले. आरक्षण उपलब्ध होताच काही दिवसांतच कोकण व त्यामार्गे जाणाऱ्या गाडय़ांतील सर्व आसने आरक्षित झाली असून प्रतीक्षा यादीही मोठी झाल्यामुळे आरक्षण देणे रेल्वेने बंद केले आहे.

गेली दोन वर्षे करोनाच्या साथीमुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची संख्या कमी होती. यंदा मात्र आतापासूनच गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाडय़ा भरल्या आहेत.

कोणत्या गाडय़ा भरल्या ?

मुंबईतून मडगावला जाणाऱ्या १०१०३ मांडवी एक्स्प्रेसचे रत्नागिरीपर्यंत शयनयान श्रेणीचे आरक्षण २७ ते ३० ऑगस्टपर्यंत (रिग्रेट) उपलब्ध नाही. याच गाडीची २६ आणि ३१ ऑगस्टला २०० पेक्षा जास्त प्रतिक्षा यादी आहे. वातानुकूलित तिसऱ्या श्रेणीसाठी २७ ते २९ ऑगस्टपर्यंत प्रतिक्षा यादी जास्त झाल्याने आरक्षण उपलब्ध नसल्याचे दाखविले जात आहे. वातानुकूलित दुसऱ्या श्रेणीचे आरक्षणही प्रवाशांना मिळालेले नाही. सीएसएमटी ते मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमधील द्वितीय आसन श्रेणीचे २७,२८, ३० आणि ३१ ऑगस्टसाठीचे आरक्षण उपलब्ध नाही.

गाडी क्रमांक ११००३ दादर ते सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेसच्या शयनयान श्रेणीचे २७ ते ३१ ऑगस्ट आणि या गाडीच्या वातानुकूलित द्वितीय श्रेणीचे २८, २९ ऑगस्ट, तर गाडी क्रमांक १६३४५ एलटीटी ते त्रिवेंद्रम नेत्रावती एक्स्प्रेसमधील शयनयान श्रेणीचे २८ ते ३० ऑगस्टपर्यंत आरक्षण उपलब्ध (रिग्रेट) नाही. गाडी क्रमांक ११०९९ एलटीटी ते मडगाव डबल डेकर, गाडी क्रमांक १२६१९ एलटीटी ते मेंगलोर मत्स्यगंधा सुपरफास्ट एक्स्प्रेससह कोकणात जाणाऱ्या बऱ्याच गाडय़ांमधीलही काही श्रेणीचे आरक्षण उपलब्ध नसून प्रतिक्षा यादीही मोठी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page