मालवण /-

देवबाग येथील धूपप्रतिबंधक बंधाऱ्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खासदार फंडातून एक कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध करून दिला होता. या बंधाऱ्याच्या कामाचे भूमिपूजन देवबाग येथे आज नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मंत्री नारायण राणे यांनी सांगितले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली देशाची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. याउलट राज्यातील सरकार राज्याला लुटण्याचे काम करत आहे. प्रगती, दरडोई उत्पन्न, विकासात राज्याची पिछेहाट सुरू आहे. त्यामुळे लवकरच राज्यातील हे सरकार जावून पुन्हा भाजपचे सरकार येईल. देशाबरोबर राज्यातील पुढील ५० वर्षे भाजपचीच सत्ता कायम राहील, असे यावेळी राणे म्हणाले. १९९० मध्ये निवडून आल्यावर देवबाग ग्रामस्थांनी याठिकाणी बंधाऱ्याची मागणी केली ती पूर्ण केली आणि गावही वाचविला. यापुढेही देवबागवासियांच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहणार आहे. मात्र जनतेला फसविणारे लोकप्रतिनिधी नकोत. त्यामुळे याचा येथील जनतेने विचार करायला हवा. केंद्रीय मंत्री म्हणून मोदींनी जी जबाबदारी दिली ती यशस्वीरित्या पार पाडत आहे. काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या यादीत लघु, सूक्ष्म, मध्यम उद्योग मंत्रालय प्रथम क्रमांकावर आहे. असे काम माझे मंत्रालय करत आहे. विरोधक तुमच्याकडे लक्ष देत नाहीत. स्थानिक आमदाराला गेल्या आठ वर्षात बंधाऱ्याचा प्रश्न मार्गी लावता आला नाही. त्यामुळे जनतेचा, या भागाचा विकास करण्याची खरी धमक कोणात आहे हे जनतेने ओळखले पाहिजे. स्थानिक आमदारात धमक, हिंमत नाही. राज्याचे मुख्यमंत्री केवळ बोलतात प्रत्यक्षात काम कुठे आहे? राज्य दिवाळखोरीत जात असून विकास ठप्प आहे, असे म्हणत नारायण राणे यांनी राज्य शासनावर ताशेरे ओढले.

जिल्ह्यात प्रक्रिया उद्योग आले पाहिजेत. माशावर प्रक्रिया करणारे उद्योग झाले पाहिजेत. पर्यटन, काथ्या उद्योग या माध्यमातून प्रत्येक घरात विकास झाला पाहिजे. यासाठी आवश्यक ते माझे सहकार्य राहिल. जनता राज्यातील महाविकास आघाडीच्या कारभाराला कंटाळली आहे. त्यामुळे येत्या काळात जनता त्यांना त्याची जागा निश्चितच दाखवून देईल. आत्मनिर्भर भारत बनविणाऱ्या भाजपच्या पाठीशी जनता ठामपणे उभी राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

माजी खासदार निलेश राणे म्हणाले, केंद्रीय मंत्री राणे यांनी देवबागवासियांना दिलेला शब्द पूर्ण केला. जिल्हाधिकाऱ्यांनीही कोटी रूपयाच्या बंधाऱ्याच्या कामास तत्काळ मंजुरी दिली,असे माजी खासदार डॉ.निलेश राणे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page