कणकवली /-

खारेपाटण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशदरावर असलेल्या आणि आजूबाजूच्या सुमारे ४० ते ५० गावाचे केंद्रबिंदू असणाऱ्या खारेपाटण या गावातील ऐतिहासिक व ब्रिटिशकालीन बाजारपेठेतुन थेट घोडेपाथर बंदर पर्यंत जाणाऱ्या रस्त्याची सध्या दयनीय अवस्था झाली असून, या मुख्य बाजारपेठेच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.तर या रस्त्यावरून नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. अत्यंत दयनीय अवस्था झालेल्या या रस्त्याच्या डागडुजी बाबत नुकतीच खारेपाटण व्यापारी असोसिशनच्या कार्यकर्त्यानी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांची भेट घेऊन आपल्या मागणीचे लेखी निवेदन त्यांना सादर केले आहे.

या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी आज पर्यंत अनेक सामाजिक संस्था, मंडळे व संघटना मार्फत संबंधित विभागाला व लोकप्रतिनिधींना निवेदने देऊन हा रस्ता दुरुस्त करण्याबाबत विनंती करण्यात आली आहे, परंतु गेली तेरा वर्षे हा रस्ता दुरुस्ती ची वाट पाहत आहे. सध्याची परिस्थिती पाहता “रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता” हीच संभ्रमावस्था ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे या रस्त्यावरून वाहन चालकांना आपली वाहने चालवताना सुद्धा त्रास होत आहे. या वाहनांच्या टायर मधून उडालेले दगड आजूबाजूच्या दुकानांमध्ये जाऊन पडत आहेत. कित्येक दुकानांच्या काचाही या या प्रकारामुळे फुटल्या आहेत. त्याचप्रमाणे या रस्त्यासाठी योग्य अशी सांडपाण्याची व्यवस्था नसल्यामुळे डोंगर भागातून येणारे पावसाचे तसेच सांडपाणी या रस्त्यावरूनच जात असल्याने हा रस्ता गटार व रस्ता अशा दोन्ही भूमिका निभावत आहे.        

संभाव्य तालुका निर्मितीकडे वाटचाल करीत असलेल्या खारेपाटणच्या या मुख्य बाजारपेठेतील रस्त्याकडे अध्याप दुर्लक्ष होत राहिले आहे. या रस्त्याच्या गैरसोय बाबत आपली व्यथा मांडण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना महिला उपसंघटक मीनल तळगावकर यांनी खारेपाटण व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यां समवेत रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे  खासदार विनायक राऊत यांची भेट घेतली. जिल्हा व्यापारी संघाचे सदस्य व पत्रकार योगेश गोडवे व्यापारी असोसिएशन अध्यक्ष वीरेंद्र जी. के., उपाध्यक्ष चंद्रकांत शेट्ये, माजी अध्यक्ष मंगेश गुरव, ज्येष्ठ व्यापारी सचिन सप्रे, सुधीर गांधी, प्रकाश मोहिरे यांनी या रस्त्याच्या कामासंदर्भात खासदार विनायक राऊत यांच्याशी चर्चा करून तात्काळ या रस्त्याच्या दुरुस्ती संबंधित कार्यवाही व्हावी अशा स्वरूपाचे निवेदन दिले. खासदार विनायक राऊत यांनी त्वरित संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून या रस्त्याच्या काँक्रिटीकरण याबाबत त्वरित कार्यवाही व्हावी अशा सूचना केल्या. त्याच प्रमाणे तशा स्वरूपाचे सही चे शिफारस पत्र संबंधित कार्यालयाला सुपूर्द केले. आणि हा रस्ता प्रामुख्याने विचारात घेतला जाईल असे आश्वासन दिले.

मतांच्या राजकारणात रस्ते विकासाचे गणित बिघडतय…

खारेपाटण मुख्य बाजारपेठेतील हा रस्ता राजकारण्याच्या मतांच्या बेरजेत कुठेतरी मागे पडतो आहे.असे सध्याचे चित्र असून गेली १३ वर्षापासून हा रस्ता विकासाच्या प्रक्रियेत मागे पडत चालला आहे.खारेपाटण बाजारपेठेत दरवर्षी पुराचे पाणी घुसून येथील व्यापारी वर्गाचे नुकसान होत आहे. याचबरोबर रस्त्याची सुद्धा झीज होऊन चिखल व घाण साचून नुकसान होत आहे. रस्त्याला भुयारी गटार सेवा नसल्याने ऐन पावसाळ्यात रस्त्यावरून वाहणाऱ्या गुडघाभर पाण्यातूनच शालेय विद्यार्थी व नागरिकांना जावे लागत आहे.तर वाहनांच्या रहदारीमुळे रस्त्यावरील चिखलाचे पाणी बाजारपेठेतील व्यापाऱ्याच्या दुकानात उडत आहे.विविध राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते मात्र खारेपाटण बाजारपेठेतील रस्त्याच्या बाबतीत आश्वासनाची बरसात करून जात आहेत.मात्र कारवाई शून्य दिसत आहे.त्यामुळे येथील व्यापारी व नागरिक हैराण झाले आहेत. राजकीय मतांचे समीकरण लक्षात घेता.सत्ताधारी पक्ष च्या मते या प्रभागात आपल्याला कमी मते मिळतात ही नाराजी आहे.तर विरोधी पक्षाच्या मते आमची सत्ता नसल्यामुळे आम्ही काही करू शकत नसल्याचे बोलले जात आहे.यामध्ये सर्वसामान्य नागरिकांची ससेहोलपट होत आहे.याकडे मात्र राजकरण्यांनी सपशेल पाठ फिरकलेली दिसत आहे.खासदार विनायक राऊत यांनी या रस्त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला असून खारेपाटण व्यापाऱ्यांनी आपले राजकीय वैचारिक मतभेद विसरून एकजुटीने विकासाच्या बाजूने उभे राहिल्यास रस्त्यासह अन्य कामांचा विकास व्हायला वेळ लागणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page